विक्रम बनकर, अहिल्यानगर : जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वडगावपान येथील ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेतील आरोपींच्या मुसक्या आवळल्याशिवाय पोलीस प्रशासन स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने वेळेवर घेतलेल्या काळजीमुळे विद्यार्थिनीच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाली आहे. तिच्यावरील सर्व वैद्यकीय उपचार रुग्णालयामार्फत केले जात असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला योग्य आहारही दिला जात असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थिनीच्या आईची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
उपचाराचा सर्व खर्च रुग्णालय करत असल्याने कोणतीही चिंता करू नये व तपासाबाबत काही माहिती द्यायची असल्यास ती पोलीस प्रशासनाला द्यावी, असे ते म्हणाले. पोलीस त्यांच्या पद्धतीने योग्य तपास करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या भेटीवेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, प्रवरा वैद्यकीय प्रतिष्ठानचे विश्वस्त ध्रुव विखे पाटील, वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा