PCMC : नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिका कटिबद्ध – महापौर रवि लांडगे


ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड शहरातील आर्थिक दुर्बल घटकांतील प्रत्येक पात्र कुटुंबाला सुरक्षित आणि मूलभूत सुविधांनी सुसज्ज घर मिळाले पाहिजे, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.  आर्थिक दुर्बल घटकांच्या किवळे प्रकल्पांतील सदनिकांची संगणकीय सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीमध्ये निवड झालेल्या नागरिकांचे शहरातील स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे किवळे येथील आर्थिक दुर्बल घटकांच्या उर्वरित ७५ सदनिकांची चिंचवडमधील ऑटो क्लस्टर येथील सभागृहात महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संगणकीय सोडत काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सोडतीतील विजेत्या सदनिका लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात पत्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, उपायुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त डी. डी. कांबळे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे पुढे म्हणाले, समाजातील सर्व घटकांना हक्काचं घर मिळावं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे. पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांचे घराचे स्वप्न केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून पिंपरी चिंचवड महापालिका पूर्ण करीत आहे, असे देखील महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपायुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले की, शहरातील आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना सुरक्षित व मूलभूत सुविधांनी युक्त निवारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.  विजेत्या लाभार्थ्यांनी स्वहिस्सा रक्कम भरणे व अनुषंगिक बाबीसाठी साठी झोपडपट्टी विभागात संपर्क साधावा असे देखील म्हणाले. 

पिंपरी चिंचवड शहरातील आर्थिक दुर्बल घटकांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राधान्याची बाब आहे. या प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि वेळेचे काटेकोर पालन सुनिश्चित केले जात आहे. नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून आगामी काळातही अशा उपक्रमांना गती देण्यात येईल.

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने