Sindhudurg : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला इंधन व गॅस पुरवठ्याचा सखोल आढावा

 

ब्युरो टीम : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज सिंधुदुर्गनगरी जिल्हाधिकारी कार्यालयात IOCL, BPCL व HPCL या तेल कंपन्यांच्या गॅस तसेच पेट्रोल/डिझेल विभागाच्या सेल्स अधिकाऱ्यांसह MNGL कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यातील इंधन व गॅस पुरवठ्याची स्थिती सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली असून प्रशासनाकडून आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. 

बैठकीत सर्वप्रथम जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल साठ्याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. उपलब्ध साठा, पुरवठा साखळी व भविष्यातील गरज यांचा आढावा घेण्यात आला.  यासोबतच जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप वितरकांशी सातत्याने समन्वय ठेवून कोणत्याही परिस्थितीत इंधनाची टंचाई भासू नये यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या. 

तसेच एलपीजी गॅस साठ्याबाबतही बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सर्व सेल्स अधिकाऱ्यांनी वितरकांशी समन्वय साधून मागणीनुसार वेळेवर पुरवठा करावा, अशा सूचना देण्यात आल्या. शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार गॅस बुकिंगनंतर 45 दिवसांच्या आत वितरण सुनिश्चित करण्यासाठी नियंत्रण ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले, जेणेकरून नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये.

याशिवाय PNG (पाइपद्वारे नैसर्गिक वायू) जोडणी विस्ताराबाबत MNGL कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. ज्या तालुक्यांमध्ये पाइपलाइन जोडणी पूर्ण झाली आहे त्याची अद्ययावत माहिती सादर करण्यास सांगण्यात आले, तसेच विस्तारात येणाऱ्या अडचणी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश देण्यात आले. PNG जोडणीच्या सुविधेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी व्यापक प्रसिद्धी करण्यावरही भर देण्यात आला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने