Ahilyanagar Shivsena : फुले दांपत्यांच्या पूर्णाकृती स्मारकासाठी वाडिया पार्क येथील जागा उपलब्ध करून द्या, शिवसेनेची मागणी


विक्रम बनकर,  अहिल्यानगर :
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भव्य पूर्णाकृती स्मारकासाठी शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलातील जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन देण्यात आले.

प्रस्तावित अद्यावत स्मारकामध्ये वाचनालय, अभ्यासिका, ऑडीटोरिअम हॉल, ग्रंथालय तसेच पूर्व परीक्षा केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. हे स्मारक महाराष्ट्राला दिशा देणारे तसेच पर्यटकांचे आकर्षण ठरणारे असावे, अशी भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आली.

तसेच या स्मारकाचे डिझाईन इंजिनिअरींग असोसिएशन आणि क्रिडाईसारख्या नामांकित संस्थांकडून करून घेण्यात यावे, अशी विनंतीही प्रशासनाकडे करण्यात आली आहे. 

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, समाजसुधारणा आणि समतेसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक आणि भव्य स्मारक उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले की, प्रस्तावित स्मारक हे केवळ स्मृतीस्थळ न राहता विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल. वाचनालय, अभ्यासिका आणि पूर्व परीक्षा केंद्राच्या माध्यमातून युवकांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी शिवसेनेचे नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहा व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने