ब्युरो टीम : समता जोगेश्वरी मंडळ संचलित एकनाथ माध्यमिक विद्यालयाच्या २००७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. तब्बल अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत जुने मित्र, शिक्षक आणि शाळेशी पुन्हा एकदा नाळ जोडली. कार्यक्रमामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.
या स्नेहमेळाव्यास समता जोगेश्वरी मंडळाच्या अध्यक्षा वैशाली पवार, सचिव तथा माजी मुख्याध्यापक बबनराव पवार, मुख्याध्यापक माधव काटे, शिक्षक बाळासाहेब घोरपडे, नवनाथ डुचे, प्रकाश दहिफळे, कैलास नजन, अर्जुन घुगे, दिनेश बोडके, विद्या भागवत, दत्तात्रय गुजर, संजय मगर, धोंडीराम काळे यांच्यासह २००७ च्या दहावी बॅचचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बबनराव पवार यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा इतिहास, विद्यालयाची शैक्षणिक परंपरा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविण्यात संस्थेचे योगदान याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी शाळेसमोर असलेल्या विविध समस्या, इमारतीच्या दुरुस्तीची आवश्यकता, आधुनिक शैक्षणिक साधनसामग्रीची गरज तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत उपस्थित माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. वर्गातील गंमती-जमती, शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांच्या स्पर्धांच्या आठवणींनी अनेकजण भावूक झाले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या यशस्वी प्रवासाची माहिती देत शाळेमुळे मिळालेल्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.
स्नेहमेळाव्यानिमित्त विविध मनोरंजनात्मक उपक्रम, ओळख परेड, गप्पांचा फड तसेच समूह छायाचित्रांचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशा स्नेहमेळाव्यांचे आयोजन नियमितपणे करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच विद्यालयाच्या विकासासाठी आर्थिक व इतर स्वरूपात सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. २००७ बॅचच्या वतीने शाळेसाठी प्रोजेक्टर भेटस्वरूप देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ बेल्हेकर आणि प्रतिभा भागवत यांनी प्रभावी व आकर्षक शैलीत केले, तर कार्यक्रमाचा समारोप सुरेश शिंदे यांनी केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व माजी विद्यार्थी, आयोजक समितीने विशेष परिश्रम घेतले. शेवटी सर्वांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहबंध अधिक दृढ करण्याचा संकल्प केला.

टिप्पणी पोस्ट करा