Kolhapur :एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूरतर्फे इंटर ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन

ब्युरो टीम : एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूरतर्फे इंटर ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धा (IGSSC) – २०२६ चे २७ मे ते २९ मे २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे यशस्वी आयोजन करण्यात आले. एनसीसी संचालनालय महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध ७ एनसीसी ग्रुप मुख्यालायांच्या ७ फायरिंग संघांतील मुले व मुली कॅडेट्सनी उत्साहाने सहभाग घेत उत्कृष्ट नेमबाजी कौशल्य, शिस्त आणि क्रीडाभावाचे दर्शन घडविले. स्पर्धा एअर रायफल चाचणी आणि ०.२२ स्पोर्ट्स शूटिंग रायफल अशा दोन टप्प्यांत घेण्यात आली, ज्यामध्ये कॅडेट्सनी वेगवेगळ्या स्थितींमधून नेमबाजी करत उल्लेखनीय अचूकता व एकाग्रता दाखविली.

या स्पर्धेत एकूण फायरिंग गुणांच्या आधारे यजमान एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर संघाने प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळवले. तर एनसीसी ग्रुप मुख्यालय मुंबई 'बी' संघाने द्वितीय आणि एनसीसी ग्रुप मुख्यालय पुणे संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याखालोखाल अमरावती संघ चौथ्या, छत्रपती संभाजीनगर पाचव्या, नागपूर सहाव्या आणि मुंबई 'ए' संघ सातव्या क्रमांकावर राहिला.

वैयक्तिक कामगिरीमध्ये मुले गटात कोल्हापूर ग्रुपच्या कॅडेट साहिश तलंकारने ३१२ गुणांसह सुवर्णपदक आणि सीक्यूएमएस अभिनव शिर्केने २७३ गुणांसह रौप्यपदक पटकावले, तर छत्रपती संभाजीनगरच्या जेयूओ कार्तिक कोल्हेने २६८ गुणांसह कांस्यपदक मिळवले. मुलींच्या गटातही कोल्हापूर ग्रुपने वर्चस्व राखत जेयूओ ज्ञानेश्वरी पवारने २९२ गुणांसह सुवर्ण आणि पीओ कॅडेट सिद्धावी मानेने २९० गुणांसह रौप्यपदक जिंकले, तर अमरावती ग्रुपच्या जेयूओ कावेरी सपकाळेने २७६ गुणांसह कांस्यपदक प्राप्त केले.

स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे महाराष्ट्राच्या एनसीसी संघासाठी ४० सर्वोत्तम कॅडेट्सची निवड करण्यात आली असून, त्यांना कोल्हापूर येथे एक महिन्याचे कठोर प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा अंतिम संघ आगामी १९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२६ दरम्यान तिरुचिरापल्ली येथे महासंचालनालय राष्ट्रीय छात्र सेना (DG NCC) तर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील 'इंटर डायरेक्टोरेट स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धा (IDSSC) – २०२६' मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल.

या यशस्वी आयोजनाबद्दल एनसीसी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी आणि कोल्हापूरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांनी सर्व विजेत्या व सहभागी कॅडेट्सचे कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेच्या भव्य सत्कार व बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर आर. के. पैठणकर उपस्थित होते. याप्रसंगी कर्नल मानस दीक्षित, कर्नल संकेत चव्हाण, लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई (ट्रेनिंग ऑफिसर) यांच्यासह विविध एनसीसी युनिट्सचे कमांडिंग ऑफिसर्स, प्रशासकीय अधिकारी, ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स (JCOs) आणि एनसीसी इन्स्ट्रक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने