विक्रम बनकर, अहिल्यानगर : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात बुधवारी पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात ‘आपला मावळा महाराष्ट्र’ संघटनेच्या वतीने आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सन्मानपूर्वक भेट देण्यात आली. या प्रसंगी खासदार नीलेश लंके यांनी उपस्थित राहून संघटनेच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्याचा आढावा मांडला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे लोककल्याणकारी राज्यकारभार, शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि संस्कृती यांचा वारसा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘आपला मावळा महाराष्ट्र’ संघटना सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विशेषतः युवकांमध्ये शिवचरित्राविषयी आकर्षण निर्माण व्हावे, इतिहासाचे भान वाढावे आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा अभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. सामाजिक बांधिलकी जपत इतिहास संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्थांची आज समाजाला आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.
यावेळी खासदार नीलेश लंके यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे आहेत. ‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास घराघरांत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असून, ग्रामीण भागातील युवकांमध्ये इतिहासाबाबत जागर निर्माण करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. साहेबांनी दिलेली कौतुकाची थाप आणि शुभेच्छा आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे. या प्रेरणेतून शिवरायांचे विचार अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्यासाठी आम्ही अधिक जोमाने कार्य करू, अशी भावना लंके यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनवणे, खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह ‘आपला मावळा’ संघटनेचे राज्य सचिव प्रा. सीताराम काकडे, सुरज मोरे, मोइन काश्मीरी आणि अन्य सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमात शिवरायांच्या कार्याची आठवण करून देत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे जतन करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. समाजात सकारात्मक विचार आणि राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लागण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत अनेक मान्यवरांनी यावेळी मांडले.
पहा व्हिडीओ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात राष्ट्रप्रथम, कारण...

टिप्पणी पोस्ट करा