Solapur :आषाढी वारी 2026 यशस्वी होण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वय ठेवून कामे करावीत - जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

ब्युरो टीम:- यावर्षी आषाढी एकादशी यात्रा दिनांक 25 जुलै 2026 रोजी पार पडणार असून ती शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून कामे करावीत. तसेच सर्व पालखी मार्ग व पंढरपूर शहरात वारकरी भाविकांना प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधामुळे त्यांचे समाधान करावे, असे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले.

नियोजन भवन येथे आषाढी वारी 2026 नियोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, पंढरपूर उप विभागीय अधिकारी सचिन इथापे, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, सार्वजनिक बांधकाम विभागाने अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या सह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन पुढे म्हणाले की, आषाढी वारी 2026 मध्ये पालखी मार्गावर तसेच विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी सुविधा निर्माण करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवायची आहे अशा विभागांनी कामांची यादी 23 मे 2026 अखेरपर्यंत प्रशासनाला सादर करावी. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने विधान परिषद निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर या कामांना सवलत देण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

तसेच जिल्हा परिषद, पंढरपूर नगरपरिषद अन्य नगरपरिषद व विभागांना वारी कालावधीत विविध कामे करण्यासाठी निधी मागणीचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे शनिवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाले पाहिजेत. त्यानंतर त्या प्रस्तावावर पालकमंत्री महोदय यांची मान्यता घेऊन निधी मंजुरीची कार्यवाही करणे शक्य होणार आहे. त्याप्रमाणेच सर्व विभागांनी त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्वरित आपल्याशी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. आषाढी वारी ही कुंभ मेळाव्यानंतर सर्वात मोठी यात्रा आहे. तसेच प्रत्येक वारी नाविन्यपूर्ण असते त्यामुळे प्रत्येक यंत्रणांनी त्यांच्यावर असलेली जबाबदारीचे काटेकोरपणे नियोजन करावे असेही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सुचित केले.

एसटी महामंडळाने यावर्षीच्या वारीसाठी राज्यभरातून 5400 बसेस ची व्यवस्था केलेली आहे तरी महामंडळाने त्यांच्या सर्व बसेसची तपासणी करून घ्यावी. त्या रस्त्यामध्ये कुठेही बंद पडणार नाहीत याची खात्री करावी. नेहमीप्रमाणे पंढरपूर शहरात तात्पुरते बस स्थानक उभारून त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी व ते स्वच्छ राहील या दृष्टीने काटेकोरपणे नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या. अन्न व औषध विभागाने पंढरपूर शहर येथील सर्व हॉटेल्स किराणा दुकाने व अन्नपदार्थाची तपासणीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करावे. कोणत्याही प्रकारचा अन्नपदार्थातून अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. तर पाटबंधारे विभागाने भीमा नदीपत्रात वारी कालावधीत आवश्यक पाणी सोडावे. भीमा नदीपत्रातील होड्यांच्या दृष्टीने योग्य ती दक्षता घ्यावी असेही त्यांनी म्हटले.

मंदिर समितीने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील राहिलेली कामे त्वरित पूर्ण करून घ्यावीत. तसेच वारी कालावधीत पत्रा शेड तसेच भाविकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा व्यवस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. यावर्षीही वारी कालावधीत व्हीआयपी दर्शन बंद राहील असेही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले. वारकरी भाविकांना दर्शन घेण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावेत. 

संपूर्ण पालखी मार्ग, पालखीचे विसावा ठिकाणी, मुक्कामाचे ठिकाणी, पंढरपूर शहरात भक्ती सागर पत्रा शेड या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था चांगली करावी. त्यावर स्वच्छतेसाठी पुरेशी मनुष्यबळ उपलब्ध करावे व पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी. तसेच ज्या ठिकाणी कायमस्वरूपी शौचालय आहेत त्या शौचालयांची संपूर्ण दुरुस्ती करून घ्यावी. इथे येणाऱ्या भाविकांना वारकऱ्यांना शौचालयाची चांगली व्यवस्था राहील या दष्टीने सर्व संबंधितांनी  प्रयत्न करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले.

पालखी मार्गावरील अंगणवाडी शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांच्या दुरुस्तीची आवश्यकता असेल तर निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. पोलीस विभागाने त्यांना आवश्यक असलेल्या 700 बँकेतील चा प्रस्ताव द्यावा. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने वारी कालावधीसाठी आवश्यक औषधी खरेदी वेळेत करावी. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आरोग्य पथके तयार करावीत मोबाईल आरोग्य पथकेही तयार करावेत. पालखी विसावा ठिकाण व मुक्कामाच्या ठिकाणी पालखी गेल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केल्या.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पालखी महामार्गावर ग्रामीण भागात पालखी व भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी 61 कोटीच्या निधीचा आराखडा तयार केलेला आहे. या अंतर्गत दहा हजार मोबाईल टॉयलेट, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तसेच अन्य 22 ठिकाणी जर्मन हँगर मंडप उभारला जाणार आहे. यातून वारकऱ्यांना आरोग्य सुविधा, चार्जिंग स्टेशन, पाणीपुरवठा, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी मुरमीकरण रस्ते आदी कामे प्रस्तावित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माळशिरस उपविभागीय अधिकारी विजया पांगरकर यांनी  पालखी मार्गावर केलेल्या व आवश्यक असलेल्या सुविधांची माहिती दिली. पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी नगर परिषदेच्या वतीने पंढरपूर शहरात भाविकांसाठी नियोजित असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यामध्ये भक्ती सागर येथे एक हजार ऐंशी कायमस्वरूपी टॉयलेट उभारलेले आहेत व वाखरी पालखी तळावर दोन हजार मोबाईल टॉयलेट उपलब्ध केले जाणार आहेत. तर दोनशे सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर मंदिर समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी भाविकांसाठी देण्यात येणार असलेल्या आरोग्य सुविधा, पाणी जेवण सुरक्षा यंत्रणा या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने