ब्युरो टीम : अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी स्वत:च्याच गाडीची चोरी भासवुन इन्शुरन्स क्लेम लाटण्याचा कट उघड केला असून फिर्यादीसह 03 आरोपींना अटक करुन 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी अर्शद आयुब शेख रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर याने त्याचे मालकीची स्कॉर्पीओ गाडी चोरी झालेबाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरुन तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 418/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अहिल्यानगर शहरातुन वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये घडत असल्याने मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी, यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, सुनिल पवार, फुरकान शेख, अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करुन सदर पथकास वाहन चोरीच्या घटनाठिकाणी भेटी देवुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.
दिनांक 04/06/2026 रोजी वर नमुद पथक हे वाहन चोरीचे घटनांमधील आरोपींची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा संशयीत आरोपी मैनुद्दीन शकिल पठाण रा. श्रीरामपुर याने व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीनुसार पथक आरोपीचा शोध घेत असतांना 1) मैनुद्दीन शकील पठाण वय 21 वर्षे, रा. टिळक नगर, श्रीरामपुर ता. श्रीरामपुर यास श्रीरामपुर शहर परिसरामध्ये ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने गुन्ह्यातील फिर्यादी 2) अर्शद आयुब शेख रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर याचे सांगणेवरुन 3) सलमान मेहबुब खान वय 21 वर्षे, रा. कोठला, अहिल्यानगर, ता. जि. अहिल्यानगर याचे मदतीने इन्शुरन्स क्लेम लाटण्याचे हेतुने स्कॉर्पीओ गाडी चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.
आरोपीचे ताब्यातुन गुन्हा करतेवेळी वापरलेला 5,00,000/- रुपये किमतीचा छोटा हत्ती टेम्पो व 5,00,000/- रुपये किमतीची स्कॉर्पीओ असा एकुण 10,00,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तपासामध्ये फिर्यादी याने स्वत:च्या मालकीची स्कॉर्पीओ गाडी चोरीला गेल्याची खोटी तक्रार देवुन इन्शुरन्स कंपनीकडुन विम्याची रक्कम लाटण्याच्या उद्देशाने रचलेला कट काही दिवसांत उघडकीस आणला असुन गुन्ह्यातील मुळ फिर्यादीसह त्याच्या वरील दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
ताब्यातील आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याचे पुढील तपासकामी तोफखाना पोलीस ठाणे येथे हजर करुन त्यांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा