ब्युरो टीम : अहिल्यानगर येथील विद्या प्रतिष्ठान (महाराष्ट्र) संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात नवनियुक्त प्राचार्य डॉ. शिवाजीराव देसाई यांनी पदभार स्वीकारला. यानिमित्त महाविद्यालयात स्वागत व अभिनंदन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी संस्थेचे सहकार्यवाह प्राचार्य डॉ. रवींद्र चोभे यांनी डॉ. देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमास प्र. प्राचार्य डॉ. अमरनाथ कुमावत , उपप्राचार्य डॉ. गोकुळदास लोखंडे , तसेच गोखले एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, संगमनेरचे प्राचार्य डॉ. कैलास दौंडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी नवनियुक्त प्राचार्य डॉ. शिवाजीराव देसाई यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या गुणवत्ता वृद्धी, शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधन संस्कृती, डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर तसेच विद्यार्थी-केंद्रित शिक्षण यावर भर देत महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता व्यक्त केली. गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संघभावनेच्या बळावर महाविद्यालयाला नवीन उंचीवर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , प्राध्यापकेतर सहकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. शिवाजीराव देसाई यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. समारंभ उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा