ब्युरो टीम : सावेडीतील वैदवाडीत अवैध मावा बनवणाऱ्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार शाहीद शेख, अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, संदीप पवार, विजय ठोंबरे, गणेश धोत्रे, सागर ससाणे व सोनल भागवत यांचे पथक तयार करुन अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणेकामी पथकास रवाना केले.
१८ ऑगस्ट २०२६ रोजी या पथकाला तोफखाना पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंदयाची माहिती काढत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती हा मातोश्री किराणा स्टोअरजवळ, लोखंडी चाळ, वैदवाडी येथे पत्र्याचे खोलीमध्ये सुगंधीत तंबाखु व सुपारी मिश्रण मावा तयार करून विक्री करत आहे. मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता एका पत्र्याचे खोलीमध्ये एक इसम इलेक्ट्रीक मशीनवर मावा तयार करताना मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव बबन रामा लोखंडे ( वय 32, रा.लोखंडी चाळ, वैदवाडी, सावेडी, अहिल्यानगर) असे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत घटनास्थळावरून 1 लाख 20 रुपये किंमतीची मावा तयार करण्यासाठी इलेक्ट्रीक मशीन, 10 हजार रुपये किंमतीचा 5 किलो तयार मावा, 14 हजार रुपये किंमतीची 20 किलो सुगंधीत तंबाखु मिश्रीत सुपारी चुरा व छोटया प्लॅस्टीक पुडया असा एकुण 1 लाख 44 हजरा रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा