महंत डॉ. न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराजांची घेतली सदिच्छा भेट; उद्योग, शिक्षण, अध्यात्म आणि समाजकारणावर महत्वपूर्ण चर्चा
ब्युरो टीम : उद्योगविश्वात आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे आणि ‘ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणून परिचित असलेले तौरल इंडिया ग्रुपचे भरत गिते यांनी नुकतीच भगवानगड येथे गडाचे मठाधिपती महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान भगवानगडावर साकारत असलेल्या भारतातील भव्य श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या सुरू असलेल्या कामाची माहिती महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी भरत गिते यांना दिली. मंदिराच्या भव्य संकल्पनेपासून सुरू असलेल्या कामापर्यंतची विविध माहिती त्यांनी यावेळी सांगितली.
भगवानगड ही केवळ अध्यात्माची भूमी नसून शिक्षण, संस्कार आणि सामाजिक परिवर्तनाचे केंद्र म्हणूनही कार्यरत आहे. गडावर विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेची, तसेच वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत असलेल्या संस्थेतील कीर्तनकार विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीची माहितीही शास्त्री महाराजांनी गिते यांना दिली.
यावेळी उद्योग आणि व्यवसायासोबतच शिक्षण, युवकांचे भविष्य, सामाजिक बांधिलकी, अध्यात्म आणि संस्कार अशा विविध विषयांवर सखोल व प्रेरणादायी चर्चा झाली. आधुनिक उद्योगविश्व आणि संतपरंपरेतून समाजाला दिशा देणारे अध्यात्म यांचा सुंदर संगम या भेटीत अनुभवायला मिळाला.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योगाने निर्माण केलेल्या संधी आणि अध्यात्माने दिलेले संस्कार यांची सांगड घालण्याची गरज असल्याचे मत या चर्चेतून अधोरेखित झाले.
यावेळी महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी भरत गिते यांचा श्री संत भगवानबाबा महाराजांची प्रतिमा भेट देऊन सन्मान केला. भगवानबाबांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा क्षण विशेष ठरला.
या भेटीप्रसंगी भगवानगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प. कृष्णा महाराज शास्त्री, तौरल इंडिया कंपनीचे व्यवस्थापक निलेश जायभाये, लेट्सअप मराठीचे इंजि. जनार्धन जायभाये, उद्योजक केशव नागरगोजे यांच्यासह अनेक भक्तगण उपस्थित होते.
उद्योगाच्या प्रगतीसोबत संस्कारांची नाळ जोडणारी ही भेट
भगवानगडाच्या अध्यात्मिक भूमीत उद्योगविश्वातील एका यशस्वी व्यक्तिमत्त्वाची झालेली ही भेट म्हणजे आधुनिक उद्योगक्षमता, शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि संतपरंपरेचा प्रेरणादायी संवाद ठरला.


टिप्पणी पोस्ट करा