बँकेच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी डॉ. निलेश विश्वासराव शेळके याला आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या हवाली करण्यात आले. शेळके याला आज, शनिवारी न्यायालयामध्ये हजर केले असता त्यास ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यांमध्ये २०१८ मध्ये डॉ. रोहिणी सिनारे यांनी शेळके याच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली होती. पाच कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांनी म्हटले होते. शेळके याने हॉस्पिटलला मशिनरी खरेदी करण्यासाठी बँकेकडून माझ्या नावाने कर्ज घेतले होते. मात्र मशिनरी खरेदी न करता माझ्या अकाउंट वरून त्यांनी परस्पर पैसे काढून अपहार केला व फसवणूक केली, असे त्या फिर्यादीत म्हटले होते. हा गुन्हा नंतर स्थानिक आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आलेला होता. ही घटना घडल्यानंतर या घटनेतील आरोपी डॉ. निलेश शेळके याने अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला उच्च न्यायालयात आवाहन दिले होते. तेथे शेळके याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. शेळके हा त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेला, तेथेही त्याचा अर्ज फेटाळला गेला होता. त्या दिवसापासून शेळके हा फरार होता. काल, शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून डॉ. निलेश शेळके याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने त्याला काल रात्री अटक केली. तर, आज आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी त्यांच्या पथकासह शेळके याला न्यायालयामध्ये हजर केले होते. न्यायालयामध्ये सदरची घटना ही गंभीर स्वरूपाची आहे, यासंदर्भातील तीन वेगवेगळ्या घटना आहेत, फसवणुकीची तीन गुन्हे असून एकूण रक्कम ही १७ कोटी रुपयांच्या घरांमध्ये आहे. या घटनेतील शेळके हा मुख्य आरोपी असून त्याने हे पैसे कशा पद्धतीने काढले, हे पैसे कुठे वापरले गेले, यासह विविध प्रकारचा तपास पोलिसांना करायचा असल्यामुळे त्याला पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने ३० डिसेंबर पर्यंत शेळके याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. |
टिप्पणी पोस्ट करा