‘मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी म्हणजे हे राजकीय षडयंत्र आहे,' अशी घणाघाती टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.'मराठा समाजाचा समावेश ओबीसी आरक्षणात करावा, याला विरोध असणारच. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, अशी शिफारस गायकवाड आयोगाने केली आहे. ओबीसीमधून आरक्षण द्या, असे त्यांनी म्हंटले नाही. त्यामुळे आपण स्वतंत्र प्रवर्ग तयार करीत मराठा समाजाला आरक्षण दिले. पण दुर्देवाने त्याला न्यायालयात स्थगिती मिळाली,'असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगर येथे ओबीसी मेळाव्यासाठी वडेट्टीवार आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.‘मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी सर्वांनी मिळून लढले पाहिजे. हा मुद्दा राजकीय हेतून प्रेरीत ठेवू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. याबद्दल कोणाचेही दुमत नाही,’ असे सांगून वडेट्टीवार पुढे म्हणाले, 'मराठा आरक्षण राज्यात लागू झाले होते. अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभही मिळाला होता. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मंत्री अशोक चव्हाण यांनी जेवढी मेहनत घेतली, तेवढी मेहनत मेटे यांच्या सात पिढ्या देखील घेऊ शकत नाही. मेटे हे राजकीय दृष्टीने अशोक चव्हाण यांना समितीवरून हटवण्याची मागणी करीत असून त्यांची भूमिका ही राजकीय प्रेरीत आहे. पण चव्हाण यांच्यावर आरोप केल्यावर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही वडेट्टीवार यांनी विनायक मेटे यांना दिला.
ओबीसी समाजाच्या विविध २३ मागण्या आम्ही राज्य सरकारकडे मांडल्या आहेत. त्या येत्या बजेटमध्ये घेण्याचा प्रयत्न आहे, त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘राज्यातील सरकारमध्ये तिन्ही पक्षांमध्ये समन्वय आहे. आमच्यात मतभेद नाही. जोपर्यंत भाजपची जीरवत नाही, तोपर्यंत आम्ही एकत्र राहणार,’ असे वडेट्टीवार यांनी सांगतानाच भाजपवर टीका केली. ते म्हणाले, ‘आम्ही अनेक राज्यात निवडणूक जिंकलो. पण भाजपच्या कुटील व फोडाफोडीच्या राजकारणामुळे आमच्या हातून अनेक राज्य गेली आहेत. लोकशाहीसाठी ही चांगली बाब नाही. भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे आहे. आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना इडीची नोटीस आली,उद्या मलाही येऊ शकते. बदल्याच्या राजकारणाचा पायंडा भाजपने पाडला आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की कोणीही सत्तेचा मुकुट घेऊन आलेला नाही. जे पेराल ते उगवेल आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील,’ असा इशाराही वडेट्टीवर यांनी दिला. |
टिप्पणी पोस्ट करा