शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात २५,२६ व २७ डिसेंबरला दर्शनार्थी भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी साई मंदिर हे ३१ डिसेंबरला रात्रभर खुले ठेवण्यात येत असते मात्र यंदा संस्थान करोनाच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेते याकडे साईभक्तांचे लक्ष लागले होते. आता ३१ डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय संस्थांनी घेतला आहे. शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर हे ३१ डिसेंबरला साईभक्तांसाठी रात्रभर खुले राहणार आहे. शिर्डी संस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली मात्र भाविकांनी दर्शनाला येताना ऑनलाइन पास घेऊन यावे असेही संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कानू राज बगाटे यांनी स्पष्ट केले आहे. सालाबादप्रमाणे नववर्षाचे पूर्वसंध्येला व प्रारंभास दर्शन व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गतवर्षीप्रमाणे सदर व्यवस्था कार्यरत राहणार असल्याचे संस्थाच्या वतीने स्पष्ट केले आहे. गुरुवारी (३१ डिसेंबर) रोजी श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर सुरू ठेवण्यात येणार असल्याने , ३१ डिसेंबरची साईबाबांची शेजारती व शुक्रवारची (१जानेवारी) काकड आरती होणार नाही. तसेच ३१ डिसेंबरला दर्शनरांग व मंदिर स्वच्छतेकामी रात्री ११.२५ ते ११.५५ या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. |
टिप्पणी पोस्ट करा