प्रकाश आंबेडकरांबाबत मंत्री रामदास आठवले म्हणाले...

          'प्रकाश आंबेडकर यांचा आता रिपब्लिकन सोबत संबंध राहिला नाही. कारण त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली असून रिपब्लिकन म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही,' असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडले. 'मी माझे मत व्यक्त केले होते की प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी तयारी आहे. पण त्यांचा रिपब्लिकन ऐक्याला अजिबात प्रतिसाद नाही,' असेही आठवले यांनी स्पष्ट केले. ते नगरमध्ये बोलत होते.
          ‘प्रकाश आंबेडकर यांची भाजपला आवश्यकता नाही. आंबेडकर यांना घेतल्यामुळे भाजपची फार मोठी ताकद वाढेल, असे अजिबात नाही. आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीचा एकही आमदार व खासदार निवडून आलेला नाही, त्यांनी फक्त मते खाण्याशिवाय काही केलेले नाही. त्यामुळे समाजाला त्याचा काहीही फायदा झालेला नाही. समाजाला फायदा होण्यासाठी त्यांनी एनडीएमध्ये यावं असे मी म्हणालो होतो, पण तशी त्यांची भाजपला काहीही गरज नाही. भाजपकडे अगोदरच बहुमत आहे. प्रकाश आंबेडकर यांना घेऊन भाजपची फार मोठी ताकद वाढेल, असे नाही,’ असे सांगतानाच आठवले पुढे म्हणाले,'प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच्या बळावर निवडणूक लढवून मते चांगली घेतली. परंतु एकही आमदार त्यांचा निवडून आला नाही. त्यांच्या मते खाण्याच्या राजकारणामुळे समाजाला फायदा होणार नाही. त्यासाठी त्यांनी कुठल्या तरी पक्षासोबत युती करणे आवश्यक आहे. ज्यावेळी काँग्रेससोबत आम्ही युती केली, तेव्हा आमचे चार खासदार निवडून आले होते. त्यामुळे एकटे लढून मते खाण्याचे राजकारण करण्यापेक्षा निवडून येण्याचे राजकारण करणे आवश्यक आहे. त्यासाठीच प्रकाश आंबेडकर यांनी एनडीए सोबत यावे, अशी भूमिका मांडली होती.’

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने