राज्यात प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असून 2 हजार 88 पदे भरण्यास मंजुरी


प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असून 2 हजार 88 पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबची रोस्टर प्रक्रिया वेळेत पूर्ण करून उर्वरित पद भरती बाबतही  आढावा घेऊन टप्याटप्यांनी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येईल.  या भरती प्रक्रियेबाबत शासन सकारात्मक असल्याचे  मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे. ते मुंबई विद्यापीठ येथे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन' या विषयावरील एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता ही देशाची आणि राज्याची ओळख असते. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुरूप शिक्षणाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे आणि त्यांना प्रगल्भ करणारे समाजोपयोगी शिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण मातृभाषेत असावे याला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विखुरलेल्या उच्च व तंत्र शिक्षण संस्थापासून बहूशाखीय विद्यापीठांची रचना ही काळाची गरज आहे. नवीन शैक्षणिक बदल स्वीकारून विद्यार्थांना अत्याधुनिक सुविधा देऊन प्रगत अभ्यासक्रमाच्या साहाय्याने  प्रशिक्षण,संशोधन,आणि समुदायाप्रती प्रतिबध्दता हे शिक्षण संस्थांचे स्वरूप असले पाहिजे तर त्यातून राष्ट्रविकास आणि विद्यार्थीहित नक्कीच जोपासले जाईल असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकन करून घेणे गरजेचे आहे. नॅक मूल्यांकन करण्यासाठी महाविद्यालयाच्या काही अडचणी असल्यास त्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल. परंतु नॅक मूल्यांकनामध्ये मागे राहू नये, नॅक मूल्यांकन ऐच्छिक नसून ती एक अनिवार्य बाब आहे हे लक्षात घेऊन महाविद्यालयांनी मूल्यांकन प्रक्रिया लवकर सुरू करावी,असे आवाहनही मंत्री श्री. पाटील यांनी केले.

या परिषदेला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, नॅकचे चेअरमन भूषण पटवर्धन, मुंबई विद्यापीठाचे प्र.कुलगुरू अजय भामरे, रुसाचे संचालक निपुण विनायक, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, प्र कुलगुरू दिगंबर  शिर्के, प्र.कुलसचिव शैलेंद्र देवळाणकर, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने