मुंबई ब्युरो: सर्वसाधारणपणे मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी किंवा त्या आधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती. आता जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या 1 तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार म्हणून नोंदणी करता येईल, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार 9 नोव्हेंबर, 2022 रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असून ही मतदार यादी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात अवलोकनार्थ उपलब्ध असेल, यासंदर्भात दावे व हरकती दि. 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत स्वीकारण्यात येतील तर दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी केली जाईल.
मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार 1 जानेवारी, 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी आणि एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी तयार करणे, 9 नोव्हेंबर, 2022 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे. तसेच 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी आहे. त्याचप्रमाणे, दि. 12 व 13 नोव्हेंबर 2022 रोजी दिव्यांग व महिलांसाठी आणि दि.26 व 27 नोव्हेंबर, 2022 रोजी तृतीयपंथी व देह व्यवसाय करणाऱ्या महिला, भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तींची मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
या कालावधीत दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्ष वय पूर्ण होत असलेल्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार असून ज्या नागरिकांचे दि. 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत 18 वर्ष वय पूर्ण होणार आहे, ते पण नवीन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज करु शकतील, असे जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी यावेळी सांगितले.
यासंदर्भातील दावे व हरकती असल्यास त्या दिनांक 26 डिसेंबर 2022 पर्यंत निकालात काढण्यात येणार आहेत आणि यानंतर दि. 5 जानेवारी, 2023 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी केली जाईल. या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मुंबई शहर जिल्हयातील नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी आणि यासंदर्भात काही दावे व हरकती असल्यास त्या सुद्धा कळवाव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा