ब्युरो टीम : मुंबईत 31 डिसेंबरच्या रात्री समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांची प्रचंड गर्दी होती. समुद्र किनाऱ्यांवर फटाक्यांच्या आतिषबाजीत सरत्या वर्षाला बायबाय आणि नववर्षाचं स्वागत केलं जातं. यासाठी हजारो मुंबईकर मुंबईच्या चौपट्यांवर दाखल होतात. अनेकजण मुंबईत पार्टी करतात. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आणि बेस्ट बस प्रशासनाकडून 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी महत्त्वाची योजना आखण्यात आली आहे. नववर्षाच्या आगमनाकरिता मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. नागरिकांना नववर्ष आगमन सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे साजरा करता यावा याकरीता पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबई पोलीस दलाकडून 22 पोलीस उप आयुक्त, 45 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2051 पोलीस अधिकारी आणि 11500 पोलीस अंमलदार बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांच्यासोबत महत्वाच्या ठिकाणी एस.आर.पी.एफ. प्लाटून, QRT Teams, आरसीपी, होमगार्डस् अशा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे.
“ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह” विरोधात विशेष मोहीम
मुंबई पोलीसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग तसेच फिक्स पॉईंट नेमण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि “ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह” विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. विविध आस्थापना आणि गुन्हेगारांची तपासणी मोहीम देखील राबविण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांकडून नागरिकांना महत्त्वाचं आवाहन
मद्य पिऊन वाहन चालवणारे व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे व्यक्ती, महिलांची छेडछाड करणारे व्यक्ती, अनधिकृत मद्य विकी करणाऱ्या आस्थापना, अंमलीपदार्थ विक्री किंवा सेवन यासारखी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवून नववर्ष आगमन उत्साहाने आणि जल्लोषात साजरे करावे, असे आवाहन मुंबई पोलीस दलातर्फे करण्यात आलं आहे. काही आवश्यक भासल्यास नागरीकांनी तात्काळ पोलीस मदतीसाठी 100 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं मुंबई पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे
बेस्ट बस प्रशासनही सज्ज, जादा गाड्या सोडणार
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईतील बेस्ट प्रशासन सज्ज झालं आहे. 31 डिसेंबर 2023 च्या रात्री नववर्ष स्वागतासाठी मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर जाणाऱ्या जनतेच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाच्या उपक्रमातून अतिरिक्त बसगाड्या सेवेत हजर राहणार आहेत. डिसेंबर 2023 च्या रात्री नववर्ष स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मारवे बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध बसमार्गावर रात्री एकूण 25 जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास अधिक प्रमाणात बसगाड्या सोडण्यात येतील, असं बेस्ट बस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच प्रवाशांच्या मदतीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच चर्चगेट स्थानक (पूर्व) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इत्यादी ठिकाणी वाहतूक अधिकारी तसेच बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा