16 MLA of Shivsena : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रते बाबत उद्या फैसला, सरकार निर्धास्त तर विरोधकांची धाकधुक वाढली

 


        ब्युरो टीम : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या, 10 जानेवारीला निर्णय घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार त्यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांची सुनावणी पूर्ण करून निर्णयाची तयारी केली आहे. 

या निर्णयाबाबत सत्ताधारी तसेच विरोधकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी (९ जानेवारी) सांगितले की, सभापतींचा निर्णय काहीही असो, आमचे सरकार स्थिर राहील. आमची युती कायदेशीरदृष्ट्या वैध आहे आणि आम्हाला आशा आहे की सभापतींचा निर्णयही आमच्या बाजूने लागेल. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभापती नार्वेकर यांनी आपला निर्णय जाहीर करण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट का घेतली आहे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, "न्यायाधीश दोनदा आरोपींना भेटले, त्यामुळे उद्या काय निर्णय होणार हे जनतेला समजले आहे ". महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सभापती नार्वेकर यांच्या बैठकीला आक्षेप घेत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीबाबत बोलताना "या भेटीमुळे शंका निर्माण होते, राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे" असा सल्ला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी नार्वेकरांना दिला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने