Chandrashekharji Bawankule : जीवेत शरद: शतम्

 


उसळत्या रक्तात माँ, ज्वालामुखीचा दाह दे... 

वादळाची दे गती पण, भान ध्येयाचे असू दे...!!

        आपल्या कित्येक कार्यक्रमांची सुरुवात या संघगीताने होत असते. पण हे शब्द भाजपा संघटनेत रुजवण्याचे... किंबहुना रुजवून उगवण्याचे कार्य प्रत्यक्षरुपात साकारण्याचे श्रेय निःसंशयपणे ज्यांना द्यावेच लागेल, असे आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व म्हणजेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे! आज १३ जानेवारी... त्यांचा वाढदिवस! सर्वांसाठीच एक आपलेपणाचा आनंदोत्सव! त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना आमच्या कोटी कोटी शुभेच्छा!!

        संघटना म्हणजेच कोणत्याही राजकीय पक्षाची ताकद असते. या ताकदीचा आविष्कार कोणत्याही क्षणी सिद्ध करण्याचा विश्वास आज भारतीय जनता पार्टीकडे निश्चितपणे आहे. त्याचे कारण आहे सर्व नेत्यांना सोबत घेत, कार्यकर्त्यांना विश्वासात घेत आणि विविध कार्यक्रम राबवत जनतेला दिलासा देत भाजपाला तळागाळात पोहोचवण्यासाठी अहर्निश मेहनत घेणारे आपले हे कर्तव्यनिष्ठ आणि कर्तव्यकठोर भाजपा प्रदेशाध्यक्ष !

    मागील काही कालावधीत त्यांनी महाविजयाचा संकल्प उराशी घेऊन उभा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. या दौऱ्यातच भाजपाचे युवा वॉरियर्स तयार करत त्यांच्याशी मनापासुन संवाद साधला. आज अशाच उसळत्या रक्तातून पार्टीविरोधात खालच्या पातळीवर उतरणाऱ्या विरोधकांना रोखणारा ज्वालामुखीचा दाह दिसतो. विकसित भारताचा संकल्प घेऊन भाजपा कार्यकर्ते वादळाच्या गतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ध्येय गाठण्यासाठी झेपावतांना दिसतात. २०२४ मधील महाविजयाचे ध्येय बाळगून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण झालेली दिसते. वादळाची गती रक्तात बाळगणाऱ्या, रोजच विविध कार्यक्रमात स्वतःला बेभानपणे गुंतवून घेणाऱ्या कार्यकर्त्यांना सातत्याने ध्येयाचे भान देणाऱ्या नेतृत्वाने पूर्ण महाराष्ट्रात आपल्या आदर्शवत संघटनात्मक कामगिरीचा ठसा उमटवलेला आहे.

       आपल्या प्रकृतीची यत्किंचितही पर्वा न करता संघटना वाढीचे ध्येय सतत नजरेसमोर ठेवत, तहानभूक विसरून सातत्याने महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लागल्यागत फिरत, अहोरात्र मेहनत घेत ज्या पद्धतीने बावनकुळे साहेब काम करत आहेत, ठरवूनही त्यांची कॉपी करणे अन्य कुठल्याही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना शक्य नाही. महाविजयाचा विश्वास इथे जन्म घेत असतो. संकल्पाला सिद्धीप्रत नेत असतो. कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे, त्यांना प्रगतीचा विश्वास देणे, कुठे मरगळ आली असेल तर त्यामागची कारणे जाणून घेत ती राख झटकून टाकत तो अंगार पुन्हा फुलवणे, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे आणणे, प्रसंगी कामात चुका झाल्या तर कठोर होत रागावणे यातलं काहीही कधीच कृत्रिम नसतं. जे असेल ते सगळं रोखठोक.. अकृत्रिम..! आणि तेवढीच मायादेखील अस्सलच!! 

        त्यांचं रागावणं सुद्धा एक कुटुंब मानूनच. राग व्यक्त केल्यावर क्षणातच शांत होत, मनात काहीही न ठेवणारे हे एक साफ मनाचे कुटुंबप्रमुख असतात. वर वर कठोर दिसणारे हे व्यक्तिमत्व प्रत्यक्षात खूपच भावनाशील आहे, कनवाळू आहे. म्हणुनच त्यांच्याशी जोडली गेलेली माणसे ही कायमस्वरूपी असतात, निरंतर मनातुन घट्ट जोडलेली असतात.  एक नेता म्हणून आणि एक माणूस म्हणूनही ते प्रत्येक कार्यकर्त्याला सदोदित प्रेरणादायी आहेत. 

होसला दो किसी की तुटी हुई उम्मीदों को.... ,सहारा दो किसी के थके हुए कदमों को...

जिद भर दी कार्यकर्ताओं मे ऐसी, जो आँधी मे भी दिया जला दे, जज्बा भरा ऐसा जो संघर्ष को मंजिल से मिला दे..!!

    या प्रेरणादायी नेतृत्वाची ताकद खरोखरच ही आहे की तुफानातही दिवा लावू शकण्याची हिंमत त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केली आहे. त्या सर्वांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा सोहळा आहे. आमच्या या सदोदित प्रेरणादायी नेतृत्वाचा, महाराष्ट्राच्या या लाडक्या नेत्याचा आज वाढदिवस! आदरणीय प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना आमच्या कोटी कोटी शुभेच्छा!! आई महालक्ष्मी आपल्या मनातील सर्व इच्छाआकांक्षा परिपूर्ण करो, आपल्याला उदंड सुखीसमाधानी दीर्घायुष्य देवो आणि आभाळालाही गवसणी घालणारे लखलखीत सुयश सदैव देवो हीच आजच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चरणी प्रार्थना!!

II जीवेत शरद: शतम् II

-अविनाश पराडकर (प्रदेश प्रवक्ता, भाजपा महाराष्ट्र)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने