Amol Kolhe : जनतेच्या प्रश्नासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे अॅक्शन मोडमध्ये, पीएमसीमध्ये घेतली बैठक



ब्युरो टीम :  शिरूर लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा संसदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालेले खासदार डॉ.अमोल कोल्हे हे आता जनतेच्या प्रश्नासाठी अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. पुणे महानगरपालिकेत मंगळवारी (९ जुलै २०२४) बैठक घेऊन त्यांनी हे दाखवून दिले आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये शिरुरचा समावेश होता. शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ.अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध अजितदादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव केल्यानं त्यांना सलग दुसऱ्यांदा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. आता त्यांनी या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

डॉ.कोल्हे यांनी ५ जुलै २०२४ रोजी जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघात जनता दरबार आयोजित केला होता. या जनता दरबारास नागरिकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला होता. यावेळी नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, अतिक्रमणे, वाहतूक कोंडी अशा अनेक विषयांबाबत समस्या मांडल्या होत्या. या समस्या सोडवण्यासाठी मंगळवारी (९ जुलै २०२४) पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत डॉ.कोल्हे यांची बैठक पार पडली. या बैठकीत जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडावा, अशा सूचना डॉ.कोल्हे यांनी दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने