Shrirampur Crime :खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी बारा तासात जेरबंद, असा घेतला पोलिसांनी शोध



ब्युरो टीम : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे बुधवारी (६ नोव्हेंबर) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लोखंडी रॉड व चाकुने मारहाण केल्यानं कमलेश उत्तम पवार यांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील आरोपींना अवघ्या बारा तासात श्रीरामपूर शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विजय उर्फ टम्या गुलाब अडागळे ( वय 32, रा.वॉर्ड नं.6, श्रीरामपूर) आणि तौफीक आयुब पठाण, (वय 29, रा.वॉर्ड नं.1, श्रीरामपूर जि.अहिल्यानगर) असे आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर येथे मंगळवारी (५ नोव्हेंबर) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कमलेश उत्तम पवार, योगेश जगधने असे दारू पिऊन मित्राचे घरी बसले होते. त्यावेळी विजय उर्फ टम्या गुलाब अडागळे याने कमलेश पवार यास फोन केला व त्यांच्यामध्ये फोनवर एकमेकास शिवीगाळ केली. त्यानंतर रात्री साडे बारा वाजता ज्ञानेश्वर बाळासाहेब हसे आणि कमलेश पवार पुन्हा दारू विकत घेण्यासाठी मोटार सायकलवरून जात असताना विजय उर्फ टम्या अडागळे व इतर दोन अनोळखी इसमांनी आयकॉन कॉम्प्युटरच्या मागील कॉलनी येथे त्यांना अडवून त्यांच्यावर लोखंडी रॉड व चाकुने हल्ला केला. त्यात कमलेश उत्तम पवार यास जबर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. याबाबत ज्ञानेश्वर बाळसाहेब हसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन, गुन्हयातील आरोपी तात्काळ ताब्यात घेण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार मनोज गोसावी, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, संतोष खैरे, सागर ससाणे, रोहित येमुल, रमीजराजा आत्तार, रणजीत जाधव, अर्जुन बडे, उमाकांत गावडे व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सोळंके व पोलीस अंमलदार संभाजी खरात, अमोल गायकवाड, धनंजय वाघमारे, लाला पटेल अशांचे पथक नेमुण वर नमुद गुन्ह्याचा आरोपी यांचा शोध घेणेबाबत आवश्यक सूचना देवून पथकास रवाना केले. 

अशा घेतला आरोपींचा शोध

पोलिसाच्या पथकाने घटनाठिकाणी भेट देऊन, तांत्रीक विश्लेषण व आसपासचे सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी निष्पन्न केले. निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत गुन्हयातील आरोपीची माहिती काढुन, आरोपी फरार होण्याच्या तयारीत असताना श्रीरामपूर शहरामधून ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव  विजय उर्फ टम्या गुलाब अडागळे ( वय 32, रा.वॉर्ड नं.6, श्रीरामपूर) व तौफीक आयुब पठाण (वय 29, रा.वॉर्ड नं.1, श्रीरामपूर जि.अहिल्यानगर) असे सांगितले. ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने