ब्युरो टीम : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे दुचाकीच्या (क्र. एमएच १६ डीके ८०५) डिक्कीतून साडे तीन लाख रुपये एक व्यक्ती घेऊन चालला होता. या व्यक्तीला अडवून त्याच्याकडील साडे तीन लाख रुपये राहुरी पोलिसांनी जप्त केले आहेत. निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमी पोलिसांनी बुधवारी (६ नोव्हेंबर) रोजी ही कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती दुचाकीवर राहुरी येथे रोख रक्कम घेऊन येत आहे. त्यानुसार पोलीस पथकाने शाकीर सत्तार शेख (वय २९ रा.वांबोरी, जि. अहिल्यानगर) याला दुचाकीच्या डिक्कीमध्ये रोख रक्कम साडेतीन लाख रुपये घेऊन जाताना पकडले. शाकीर शेख याला रोख रकमेबाबत कुठलाही खुलासा देता न आल्याने तपास पथकाने सदर बाब माननीय निवडणूक निर्णय अधिकारी शाहू मोरे यांना कळवली. त्यानंतर निवडणूक अनुषंगाने निर्माण केलेले भरारी पथक प्रमुख शुभम ठिगळे, फोटोग्राफर रोहन गायकवाड यांना घटनास्थळी बोलावून सदर इसमाच्या ताब्यातील रोख रक्कम साडेतीन लाख रुपये पंचा समक्ष पंचनामा करून जप्त करून पोलीस स्टेशन राहुरी येथे मुद्देमाल कक्षात जमा केली. सदर रोख रकमेबाबत चौकशी सुरू असून माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांना सदर बाबत अहवाल पाठवण्यात आलेला आहे.
पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर.ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड, अशोक शिंदे विकास साळवे, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, आजिनाथ पाखरे,गोवर्धन कदम, सचिन ताजने, शकूर सैय्यद यांच्या पथकाने ही कारवाई केली.
टिप्पणी पोस्ट करा