HSC EXAM :'या' जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही वॉच


विक्रम बनकर, अहिल्यानगर : जिल्ह्यात इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत, सुरळीत व कॉपीमुक्त व्हाव्यात, यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येत असून जिल्हाधिकारी कार्यालयात वॉररुमचीही स्थापना करण्यात आली आहे. शाळेत कॉपीचा प्रकार निदर्शनास आल्यास शाळेची परीक्षा केंद्रासह मान्यताही रद्द करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिला आहे. 

जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या होणाऱ्या परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त होण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील  संवेदनशील व महत्त्वाच्या परीक्षा केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येत आहे.  ड्रोनकॅमेरा ,सीसीटीव्ही तसेच परीक्षा केंद्रातील वेबकास्टिंगचे संनियंत्रण दक्षता समितीमार्फत करण्यात येत आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नये, यासाठी परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणार्‍या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचार्‍यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचार्‍यांमधून करण्यात येणार आहे. 

परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहणार आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावरुन विशेष भरारी पथक, संवेदनशिल केंद्रावर अधिक बंदोबस्त देण्यात आला आहे. राज्य परीक्षा मंडळाकडून भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून जिल्हाभरात ही पथके कार्यरत झाली आहेत.

१० वी व १२ वीची बोर्ड परीक्षेसंदर्भात जिल्हास्तरीय दक्षता समिती सदस्यांनी परीक्षा सुरू होताच विविध पातळ्यांवर काम करायला सुरुवात केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी अशोक कडूस,शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, बाळासाहेब बुगे (शिक्षणाधिकारी - योजना), पोलिस निरीक्षक खेडकर, आकाश दरेकर, सुरेश ढवळे,श्रीराम थोरात,लहू गिरी,जितिन ओहोळ,भावेश परमार आदी समिती सदस्य जिल्ह्यातील विविध केंद्रांवरील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

पहा व्हिडीओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने