ब्युरो टीम : नागपूर जिल्ह्यातील विविध तलाव व धरणे पावसाळ्यात पाण्याने भरल्यामुळे पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. मात्र, याच ठिकाणी नागरिकांकडून होणाऱ्या धाडसी कृतीमुळे दुर्घटनांची शक्यता वाढते आणि दरवर्षी अनेक दुर्दैवी घटना घडतात. ऑगस्ट २०२४ मध्ये मकरधोकडा तलावात एका युवकाचा अशाच प्रकारे मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून आणि निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन विभागाने मकरधोकडा तलावासाठी रिमोट कंट्रोल वॉटर क्राफ्ट खरेदी केला आहे.
हा एक प्रकारचा रिमोटने चालणारा वॉटर क्राफ्ट असून बुडणाऱ्या व्यक्तीला जलद मदत पोहोचवण्याचे कार्य करतो. पावसाळ्यात या क्राफ्टसह मनुष्यबळ तैनात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक ग्रामपंचायतीतील दोन युवकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना संबंधित कंपनीकडून मानधनही दिले जाणार आहे.
ग्रामपंचायत मकरधोकडा यांच्याकडे हे क्राफ्ट सुपूर्त करण्यात आले असून ९ एप्रिल रोजी त्याचे प्रात्यक्षिक व तपासणी मकरधोकडा तलाव परिसरात पार पडली. या वेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, नायब तहसीलदार वाडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. हा पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील अन्य जलाशयांमध्येही अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे.
टिप्पणी पोस्ट करा