ब्युरो टीम: पिंपरी चिंचवड महानगरपालिका करआकारणी व करसंकलन विभागाकडून सन २०२५-२६ या वर्षाची मालमत्ता कराची बिले वितरण करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत प्रशासकीय नियंत्रणाखाली महिला बचत गटातील महिलांना मालमत्ता कराची बिले वितरण करण्यापूर्वीचे प्रशिक्षण मंगळवारी (दि. १५) यशस्वीरीत्या देण्यात आले. हा उपक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी उपयुक्त ठरत आहे.
या प्रशिक्षणात बोलतांना महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाचे प्रमुख श्री. अविनाश शिंदे यांनी महिलांना मालमत्ता कर प्रणालीविषयी प्राथमिक माहिती दिली. तसेच करआकारणीची प्रक्रिया, बिलाचे स्वरूप, बिल वाटप, अँप्लिकेशनबाबतची माहिती, त्यामधील विविध तपशील, तसेच बिले वितरण करताना घ्यावयाची दक्षता, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बिलांचे वितरण करताना नागरिकांशी संवाद कसा साधावा, शंका कशा सोडवाव्यात, यावरही प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला. महिलांनी या सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रश्नोत्तरांच्या सत्रात आपले अनुभव आणि समस्या व्यक्त केल्या. महिलांच्या समस्यांचे समाधान संबंधित अधिकाऱ्यांनी केले.
महापालिकेने सन २०२५-२६ हे आर्थिक वर्ष १ एप्रिल पासून सुरु झाले आहे. या वर्षीची मिळकतकर बिले ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली असून, करदात्यांना त्यांच्या नावावर नोंद असलेल्या मालमत्तांची बिले www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर पाहता व भरता येतील. तसेच मालमत्ता कर बिले ३० जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने बिले भरल्यास सामान्य करावर १० टक्के सवलत मिळणार आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटातील महिलांना प्रशासकीय ओळखपत्र देण्यात आले आहे. या महिलांच्या माध्यमातून नागरिकांना १६ एप्रिलपासून घरोघरी वितरित केली जाणार आहेत.
ज्या मालमत्ता कर बिलांवर "थकबाकीदार" असा शिक्का आहे त्याबरोबर त्यांना जप्तीपूर्व नोटीस बजावली जाणार आहे. बिले वितरित करताना ती मालमत्ताधारकाच्याच स्वाधीन करण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव, सुरक्षारक्षक यांनी कोणतीही अडथळा न करता वितरक महिलांना प्रवेश आणि सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे महिलांना महापालिकेसोबत काम करण्याची संधी उपलब्ध झाली असून, त्यांच्या आर्थिक सक्षमतेस बळकटी मिळणार आहे. त्याचबरोबर नागरिकांपर्यंत वेळेवर बिले पोहोचवण्याच्या उद्देशालाही चालना मिळणार आहे. 'सिद्धी' प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिका केवळ महसूल वाढवण्यावर भर देत नाही, तर सामाजिक सहभाग, महिला सबलीकरण आणि कार्यक्षम सेवा वितरण हेही समान महत्त्वाने साध्य करत आहे.
महिला बचत गटातील महिलांच्या माध्यमातून मिळकतकर बिले घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी महापालिकेने महिला आर्थिक विकास सोपवली आहे. महिलांनी प्रशिक्षण घेऊन हे कार्य पार पाडण्यासाठी तयारी दर्शवली आहे. बिले वाटप करणाऱ्या बचतगटातील महिलांना सहकार्य करून मिळकत कराची बिले स्वीकारावेत. तसेच मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घ्यावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
मिळकतकर बिले मिळाल्यानंतर त्यांचा तात्काळ भरणा करणे ही प्रत्येक करदात्याची जबाबदारी आहे. वेळेत कर भरल्यास महापालिकेला वेळेवर महसूल मिळतो आणि नागरी सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देता येतात. नागरिकांनी बिले स्वीकारताना वितरकांना सहकार्य करावे आणि कोणतीही अडचण असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
घरोघरी मिळकत कराचे बिल वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे माहे जूनपूर्वी वेळेत आगाऊ संपूर्ण कराचे बिल भरून करसवलतीचा नागरिकांना लाभ घेता येईल. त्याचबरोबर मालमत्तेशी मोबाईल क्रमांक बिनचूक जोडणी केल्यास मालमत्तेशी संबंधित अद्ययावत माहिती मोबाईलवर उपलब्ध होईल. क्स`
- प्रदीप जांभळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी चिंचवड महानगरपालिका
टिप्पणी पोस्ट करा