PCMC : नागरिकांना देण्यात आले अग्निसुरक्षेचे धडे!


ब्युरो टीम :  इमारतीच्या आठव्या मजल्यावर अचानकपणे लागलेली आग... स्थानिक रहिवांशाकडून आग विझवण्याचा केला जाणारा प्रयत्न.... नागरिकांनी संपर्क करताच आग विझवण्यासाठी अवघ्या काही मिनिटात अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर मिळवलेले नियंत्रण.... असा थरारच पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात असणाऱ्या शरदनगर व दुर्गानगर सहकारी गृहनिर्माण संस्था येथे मंगळवारी (१५ एप्रिल) सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० यावेळेत पाहण्यास मिळाला. निमित्त होते महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘म़ॉक ड्रिल’चे.

भारतात दरवर्षी १४ एप्रिल ते २० एप्रिल हा आठवडा ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह’ म्हणून पाळला जातो. १४ एप्रिल १९४४ मध्ये मुंबई डॉक येथे लागलेल्या विनाशकारी आगीत प्राण गमावलेल्या जवानांच्या शौर्य व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी १४ एप्रिल हा दिवस समर्पित आहे. या दिवसानंतरचा संपूर्ण आठवडा ‘अग्निसुरक्षा सप्ताह’ म्हणून पाळला जातो. महानगरपालिकेच्या वतीनेही या सप्ताहाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. 

अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी मंगळवारी निगडी येथील शरदनगर व दुर्गानगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित,  सेक्टर क्र. २० येथे अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना व मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. या मॉक ड्रील अंतर्गत इमारतीच्या आठव्या मजल्यावर आग लागल्याचे दृश्य तयार करण्यात आले. सुरुवातीला स्थानिक नागरिकांकडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता लक्षात घेता, त्वरित अग्निशमन विभागास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत २ वॉटर टेंडर, २ शीघ्र प्रतिसाद वाहने (देवदूत), ब्रांटो हायड्रोलिक प्लॅटफॉर्म (स्काय लिफ्ट) व ३० पेक्षा अधिक अग्निशमन जवानांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.

या मॉक ड्रीलमध्ये उंच शिडीच्या साहाय्याने इमारतीतील अडकलेल्या नागरिकांचा यशस्वी बचाव करण्यात आला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांना आगीचे धोके ओळखणे, आग लागल्यानंतरचे योग्य पावले उचलणे, अग्निसुरक्षा उपकरणांचा योग्य वापर व आपत्कालीन प्रसंगी सुरक्षिततेच्या उपायांबाबत माहिती देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, अग्निशमन विभागाचे उप आयुक्त मनोज लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तळवडे उपकेंद्राचे उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब वैद्य यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या मॉक ड्रील मध्ये अग्निशमन विभागाचे चंद्रशेखर घुले, विकास तोडरमल, लीडिंग फायरमन शाहू व्हनमाने,  वाहनचालक नितीन कोकरे,  विशाल बाणेकर यांच्यासह एकूण ३२ अग्निशमन जवान सहभागी झाले होते. 

१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईच्या डॉकमध्ये झालेल्या भीषण स्फोटात अनेक शूर अग्निशामक जवानांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या अतुलनीय शौर्याची आणि बलिदानाची आठवण जपण्यासाठी हा अग्निशमन सेवा सप्ताह देशभर पाळला जातो. या सप्ताहाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नागरिकांनी या जनजागृती कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे. 

- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

अग्निशमन सेवा सप्ताहाला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग काळानुसार बदलत्या गरजा ओळखून अधिक सक्षम, आधुनिक आणि तात्काळ सेवा देण्यासाठी सातत्याने स्वतःला अपग्रेड करत आहे. नागरिकांमध्ये देखील विविध उपक्रमाच्या माध्यमातून अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. 

- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शाळा,  महाविद्यालये,  औद्योगिक वसाहती,  उंच इमारती,  मॉल्स,  शासकीय कार्यालये आदी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत प्रात्यक्षिके,  प्रशिक्षण व जनजागृती मोहिमा राबवण्यात येत आहेत. नागरिकांचा देखील त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

- मनोज लोणकर, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने