PCMC : महानगरपालिकेत आयुक्तांनी घेतली स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक


ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मुळा, पवना, इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांची बैठक महानगरपालिकेमध्ये घेतली. बुधवार (१६ एप्रिल) रोजी झालेल्या या बैठकीत नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाविषयी सविस्तर चर्चा झाली. 

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे , मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उप आयुक्त अण्णा बोदडे, उमेश ढाकणे,  कार्यकारी अभियंता हरविंद सिंग बन्सल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पिंपरी चिंचवड शहरामध्ये पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह यांनी बैठकीच्या सुरुवातीला नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत माहिती दिली. नदी पुनरुज्जीवन प्रकल्प उद्देश, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प याबाबत माहिती दिली.  ते म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका आहे, जी ड्रेनेज इको सिस्टिमवर काम करीत आहे. ड्रेनेज मास्टर प्लॅन तयार करण्यापूर्वी महानगरपालिकेने शहरातील ड्रेनेज लाईन, चेंबर, सध्या कार्यरत असणारे एसटीपी अशा विविध बाबींचा सर्व्हे पूर्ण केला आहे. त्यानंतर ड्रेनेज मास्टर प्लॅन तयार केला आहे. यामध्ये पुढील दहा वर्षांतील शहरातील परिस्थिती काय असेल, याचा विचार करून एसटीपी प्लॅन केले आहेत,’ असेही आयुक्त सिंह यांनी स्पष्ट केले. 

‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुळा, पवना आणि इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प करीत आहे. परंतु मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आणि इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हे तिन्ही प्लॅन खूप वेगवेगळे आहेत. नदीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हा प्रकल्प करणे आवश्यक आहे. त्यादृष्टिनेच महानगरपालिकेने नियोजन केले आहे,’ असेही बैठकीमध्ये आयुक्त सिंह यांनी सांगितले.

यावेळी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत सादरीकरण (पीपीटी) करण्यात आले, व त्याबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत असणारे मत जाणून घेतले. या प्रकल्पाबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर आयुक्त शेखर सिंह यांनी महानगरपालिकेची भूमिका विषद केली. तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींच्या सूचनांची योग्य ती दखल घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाबाबत विविध स्वयंसेवी संस्थांची प्रतिनिधींचे काही प्रश्न होते. या प्रश्नांच्या अनुषंगाने बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उद्देश व त्या अनुषंगाने करण्यात येणारे काम याबाबतचे सादरीकरण देखील बैठकीत करण्यात आले आहे. तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींकडून आलेल्या सूचनांचा देखील नोंद घेतली आहे. 

- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने