विक्रम बनकर, अहिल्यानगर : शहरातील जुन्या आरटीओ कार्यालयासमोर महानगरपालिकेच्या जागेत करण्यात आलेले पक्के अतिक्रमण अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने कारवाई करून हटवले. तेथील पत्र्याच्या शेड, ऑफीस केबिन जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करून जागेला कंपाऊंड करून जागा ताब्यात घेण्यात आली.
पोलिस अधीक्षक कार्यालय चौकालगत असलेल्या महापालिकेच्या पाण्याच्या टाकीशेजारी असलेल्या जागेत अतिक्रमण करण्यात आले होते. तेथील अतिक्रमण महानगरपालिकेने यापूर्वी कारवाई करून काढले होते. दरम्यानच्या काळात हे प्रकरण न्यायालयात गेले. सदरची जागा महापालिकेच्या मालकीची असून, नगरपरिषद काळात या ठिकाणी उद्यानही होते. त्यामुळे न्यायालयात झालेल्या सुनावणीत ही जागा महापालिकेची सरकारी जागा असल्याचे स्पष्ट झाले व जागा तत्काळ खाली करण्याचे निर्देश देण्यात आले.
त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने अभियंता सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करून अतिक्रमण हटवले. तसेच, जागेला तत्काळ तार कंपाऊंड करून जागा ताब्यात घेण्यात आली आहे. शहरातील महानगरपालिकांच्या जागांवरील अतिक्रमणांचा आढावा घेतला जात आहे. टप्प्याटप्प्याने या जागांवरील अतिक्रमणे कारवाई करून हटवण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका, कोतवाली पोलिस व तोफखाना पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई सुरू केली आहे. कोठला स्टँड, माळीवाडा बसस्थानक परिसरात अतिक्रमणांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा