Kolhapur :मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला पहिल्याच आठवड्यात मदतीचा ओघ सुरु

ब्युरो टीम: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गरीब व गरजू रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन नुकतेच १ मे महाराष्ट्र दिनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले.

या कक्षाची माहिती विविध वृत्तपत्रांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचताच पहिल्याच आठवड्यात नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासह गरजू रुग्णांचे नातेवाईकही या कक्षाला भेट देत असून, मदतीसाठी चौकशी करत आहेत.

याच दरम्यान, ७ मे रोजी सकाळी कक्ष सुरू होताच एक वेगळाच आणि प्रेरणादायी प्रसंग अनुभवायला मिळाला. निवृत्त ज्येष्ठ नागरिक निवृत्ती मल्लाप्पा सांडुगडे यांनी कक्षाला भेट देत कक्षप्रमुख डॉ. चंद्रकांत परुळेकर यांच्याकडून कार्यपद्धतीची माहिती घेतली. त्यांनी मदत मागण्यासाठी नव्हे, तर मदत देण्यासाठी आलो असल्याचे सांगत  5 हजार रु.चा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावाने सुपूर्त केला.

कक्षाच्या वतीने हा पहिला धनादेश सन्मानपूर्वक स्वीकारण्यात आला असून, सांडुगडे यांना त्यांच्या दातृत्वाबद्दल आभारपत्र देण्यात आले. या उपक्रमामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दानशूर नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. मदतीचे स्वरूप धनादेश किंवा ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे स्वीकारले जाणार आहे.

यासाठी इच्छुकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन कक्ष प्रमुखांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने