mission impossible :टॉम क्रूजचा ‘मिशन इम्पॉसिबल 8’ बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय



ब्युरो टीम : हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूज आपल्या जबरदस्त अभिनयामुळे जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्या अ‍ॅक्शन फ्रेंचायझी चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. भारतातही त्यांची लोकप्रियता तितकीच अफाट आहे. सध्या ते त्यांच्या नव्या चित्रपट ‘मिशन इम्पॉसिबल: द फाइनल रेकनिंग’ मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचे प्रीमियर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही करण्यात आले होते.

भारतात दमदार ओपनिंग

मिशन इम्पॉसिबल 8 ने भारतात पहिल्याच दिवशी १६.५० कोटींचा नेट कलेक्शन करत जोरदार ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशी हा आकडा वाढून १७ कोटींवर गेला. पहिल्या आठवड्यात एकूण ५४.४ कोटींचा गल्ला जमवण्यात या चित्रपटाला यश आलं. दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करताच चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ झाली आहे.

९ व्या दिवशीचा कलेक्शन

शनिवारी (२४ मे) या चित्रपटाने ७ कोटींची कमाई केली, तर रविवारीही कलेक्शनचा जोर कायम राहिला. सैकनिल्कच्या ताज्या अहवालानुसार, रविवारी (९व्या दिवशी) चित्रपटाने ६.३ कोटींचा गल्ला जमवला आहे. यामध्ये अजून बदल होण्याची शक्यता आहे. एकूण कमाई पाहिली तर आतापर्यंत मिशन इम्पॉसिबल 8 ने भारतात ७१.६ कोटींची कमाई केली आहे.

१०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच!

टॉम क्रूजच्या या चित्रपटाचा कमाईचा वेग पाहता, येत्या आठवड्यातच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो, असा अंदाज आहे. सध्या भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला टक्कर देणारा कोणताही मोठा हिंदी चित्रपट नाही. रेड 2 आणि राजकुमार रावच्या अलीकडील चित्रपटाला देखील मिशन इम्पॉसिबल 8 ची जोरदार स्पर्धा मिळत आहे.

चित्रपटाचा अ‍ॅक्शन, कथा आणि टॉम क्रूजचा करिष्मा यामुळे प्रेक्षक प्रचंड आकर्षित होत आहेत. त्यामुळे येत्या दिवसांत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजून विक्रम करू शकतो, अशी जोरदार चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने