Pandharpur : पालखी मार्ग, तळांवर पालखी सोहळा प्रमुखांनी सुच‍विलेले कामे प्राधान्याने करावीत,जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ब्युरो टीम : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 30 जून  तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 01 जुलै 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे.  पालखी सोहळ्याच्या प्रथा परंपरेचे जतन करण्यासाठी पालखी सोहळा प्रमुखांनी सुचविलेल्या  पालखी मार्ग, पालखी तळ व रिंगण सोहळ्याच्या  ठिकाणची कामे प्राधान्याने करावीत. तसेच पालखी सोहळ्या बरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या 

आषाढी यात्रेच्या पुर्वतयारीबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर येथे व्हीसीव्दारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त मुख्याधिकारी संदिप कोहिनकर, मुख्याधिकारी प्रशांत जाधव व्हीसीव्दारे उपस्थित होते. तसेच प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, पोलीस निरिक्षक विश्वजीत घोडके, उप अभियंता भीमाशंकर मेटकरी, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर  आदी उपस्थित होते.

यावेळी  जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले,  जिल्ह्यातील सर्वच पालखी तळावर कोठेही पाणी साठणार याची दक्षता घेवून, मुरमीकरण करुन घ्यावे. पालखी मार्ग, तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी मुबलक पाण्याची व्यवस्था करावी यासाठी टँकरची संख्या वाढवावी. पालखी सोहळ्यासह येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुरक्षा देण्यात यावी. तसेच मार्गावर वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही याबाबत नियोजन करावे.  वाखरी येथे सर्वच पालखी सोहळे एकत्र येत असतात. याठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये तसेच वाखरी पालखी तळावरुन पंढरपूरकडे दिंड्या लवकर निघण्यासाठी सोहळा प्रमुखांशी  पोलीस प्रशासनाने  चर्चा करुन नियोजन करावे.पालखी मार्ग व तळांवर स्नानगृहाची व शौचालयाची संख्या वाढवावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील अपुर्ण कामे तातडीने पुर्ण करावीत अशा सूचनाही जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी यावेळी दिल्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने