Sangli : दूध भेसळ प्रकरणी गाय दुधाचा 10 लाख 63 हजार किंमतीचा साठा नष्ट


ब्युरो टीम : अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयाने दूध वाहतुक करणाऱ्या टॅंकरची कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे तपासणी मोहिम राबविली. या मोहिमेत 5 टॅंकरमधील एकूण 75 हजार लिटर दुधाची प्राथमिक तपासणी करण्यात आली. या कारवाईत गाय दुधामध्ये भेसळीच्या संशयावरून 10 लाख 63 हजार 860 रूपये किंमतीचा 30 हजार 396 लिटर गाय दुधाचा साठा नष्ट करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

वाचा : पौडमधील मंदिरातील विटंबना समाजविघातक, कठोर कारवाई होणार, डॉ. नीलम गोऱ्हे

सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे, अन्न सुरक्षा अधिकारी पवार व  स्वामी, नमुना सहाय्यक  कवळे व कसबेकर यांनी नागज फाटा येथे थांबून तेथून जाणाऱ्या 5 दूध वाहतुक वाहनांची तपासणी केली. या टॅंकरमधील दुधाची इन्स्टंट स्ट्रीपच्या सहाय्याने भेसळीची प्राथमिक तपासणी करण्यात आली.  कोल्हापूर जिल्हा सह. दुध उत्पादक संघ (गोकुळ ) व वारणा  डेअरी, कोल्हापूर येथे जाणाऱ्या टॅंकरमधील दुधाचे 3 नमुने विश्लेषणाकरीता घेण्यात आले. टॅंकर क्र. एम एच 09 जी आर 5567 मधील गाय दुधाची प्राथमिक तपासणी केली असता त्यामध्ये मीठाची भेसळ आढळल्याने अन्न सुरक्षा अधिकारी पवार यांनी या टॅंकरमधून दोन कप्प्यामधून गाय दुधाचे दोन नमुने विश्लेषणाकरीता घेऊन गाय दुधाचा 10 लाख 63 हजार 860 रूपये किंमतीचा 30 हजार 396 लिटर गाय दुधाचा उर्वरीत साठा भेसळीच्या संशयावरुन ओतून नष्ट केला.  या गाय दुधाचा टॅंकर घेरडी तालुका सांगोला येथील एल के पी दुध शितकरन केंद्र येथून गाय दुध घेवून हामीदवाडा (ता. कागल जिल्हा कोल्हापूर) येथील दत्त इंडीया प्रा. लि. या कंपनीस जात असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अन्न नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही घेण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 

नागरिकांना अन्न पदार्थामधील भेसळीबाबत काही माहिती असल्यास तसेच अन्न पदार्थांबाबत काही तक्रारी असल्यास अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क करुन किंवा ई मेल आयडी fdasangli@gmail.com यावर माहिती किंवा तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न ) मसारे यांनी केले आहे.

पहा व्हिडिओ : अजितदादा यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी असं मलाही वाटतं - आमदार रोहित पवार

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने