ब्युरो टीम : ग्रामीण रुग्णालय आटपाडीकरीता नवीन कार्डिअॅक रुग्णवाहिकेचे लोकार्पण उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे दि. 8 मे रोजी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, आटपाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक वृषाली राऊत, मा. पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य कार्यकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीमध्ये उपस्थित केलेल्या मागणीनुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामीण रुग्णालय आटपाडी येथे एक कार्डीॲक रुग्णवाहिका खरेदी करण्याकरीता 34 लाख 3 हजार रूपये उपलब्ध करुन देण्यात आले होते. हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णामध्ये रक्ताभिसरण प्रणाली रक्तवाहिण्या, हृदय स्नायू, झडपा किंवा लय प्रभावीत करतात. बऱ्याचदा अशा रुग्णांच्या रक्तवाहिण्या आरुंद किंवा ब्लॉक होतात, ज्यामुळे छातीत दुखणे, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येतो. या रुग्णांसाठी तात्काळ कार्डिॲक रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे आटपाडी भागातील हृदय विकाराच्या झटक्यासह आता गंभीर आजारी रुग्णांना ऑक्सीजन व श्वसन सहाय्य प्रदान करण्याची आवश्यकता असलेल्या तसेच अतिगंभीर गरोदर मातांना आपत्कालीन परस्थितीला तोंड देण्यासाठी सहज शक्य होणार आहे. आटपाडी परिसरातील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेत रुग्णालयात पोहचविण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज कार्डीॲक रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा