Nashik : राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान


ब्युरो टीम:  शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणार द्राक्ष हे फळपीक महत्वाचे आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर घटकाचा समावेश करण्‍यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक  शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in वर अर्ज सादर करावेत, असे अवाहन नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

गारपीट व अवकाळी पाऊस या पासून द्राक्ष बागांचे संरक्षण करणे, शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतीच्या निर्यातक्षम द्राक्ष पिकाच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणे,  फळबागांकरीता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे व ग्रामीण भागातील युवकांना कृषी क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हाच या योजनेचा उद्देश आहे.

यासाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, 7/12 उतारा (द्राक्ष पिकाच्या नोंदीसह), 8-अ उतारा, आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खाताच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनु.जमाती शेतकऱ्यांसाठी) विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र चतु:सीमा नकाशा इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत.

या योजनेच्या लाभासाठी क्षेत्र मर्यादा 20 गुंठे ते 1 एकर दरम्यान प्रति लाभार्थी अशी आहे. खर्चाचे मापदंड  रूपये 4 लाख 81 हजाार 344 प्रती एकर  असून अनुदान मर्यादा रूपये 2 लाख 40 हजार 672 प्रती एकर (खर्चाच्या 50 टक्के) अशी आहे.  अधिक माहितीसाठी  http://krishi.maharashtra.gov.in या कृषी विभागाचे संकेतस्थळास भेट द्यावी अथवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने