Ahilyanagar : महानगरपालिकेकडून अहिल्यानगर शहरात रस्ता पॅचिंगच्या कामाला सुरुवात

विक्रम बनकर, अहिल्यानगर : मध्यवर्ती शहरात काही प्रमुख रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सध्या सुरू आहेत. मात्र, ज्या भागात कामे प्रस्तावित नाहीत, अशा ठिकाणी खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून विविध रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पॅचिंगचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

महानगरपालिकेकडून दरवर्षी मे महिन्यात रस्ता पॅचिंगची कामे केली जातात. यावर्षी मे महिन्यात अवकाळी पावसामुळे हे काम रखडले होते. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील कोर्ट गल्ली, आनंदी बाजार, सबजेल चौक, हातमपुरा, जुना मंगळवार बाजार, कापड बाजार, गंज बाजार, बुरुडगल्ली, चौपाटी कारंजा, अर्बन बँक चौक, डाळ मंडई, नालेगाव, मंगळगेट, सर्जेपूरा रस्ता अशा विविध ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात प्रमुख रस्त्यावर रस्ता काँक्रीटीकरण सुरू आहे. तेथील ड्रेनेज लाईनची कामे पूर्णत्वास आहेत. या ठिकाणी अतिक्रमणे काढून काँक्रीटीकरणाची कामे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांना गती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने ही कामे पूर्ण करण्यात येत असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

पहा व्हिडिओ :संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीची व संत सोपानदेव महाराजांच्या पालखीची बंधु भेट 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने