ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभाग आणि विद्युत विभागाच्या वतीने राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त ‘विद्युत सुरक्षा व लिफ्ट सुरक्षा’ या विषयावर आयोजित एकदिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली.
पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन महापालिकेचे सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पुणे विद्युत निरीक्षण मंडळाचे अधीक्षक अभियंता हेमंत गांगुर्डे, विद्युत विभागाचे सह शहर अभियंता माणिक चव्हाण, विद्युत निरीक्षक नितीन सुर्यवंशी, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोजच्या कामकाजात विद्युत आणि लिफ्ट सुरक्षेबाबत सजग, दक्ष व तत्पर ठेवणे, या मुख्य उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये एलिव्हेटर्स ब्रदर्स असोसिएशनच्या वतीने डॉ. म. ज्ञा. शिंदे व ह. अ. नाईक यांनी लिफ्ट सुरक्षा या विषयावर सादरीकरण व प्रत्यक्ष बचाव कार्याचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्युत निरीक्षक नि. ग. सुर्यवंशी आणि नि. धो. मुळुक यांनी ‘वीज सुरक्षा’ या विषयांवर मार्गदर्शन केले.
विजेच्या अपघातांची कारणे, सुरक्षा उपाय, वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर, सेफ्टी साहित्यांचा सुरक्षित वापर, आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद, यावर सखोल मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात आले. बचाव कार्यासाठी आवश्यक सीपीआर तंत्र, विद्युत अपघातांमुळे शरीरावर होणारा परिणाम, यावरही सविस्तर चर्चा कार्यशाळेमध्ये करण्यात आली. तसेच अग्निशमन विभागाला लिफ्ट बचावासाठी आवश्यक असलेल्या 'लिफ्ट रेस्क्यू कीज' भेट म्हणून यावेळी देण्यात आली. या चाव्यांच्या मदतीने आपत्कालीन प्रसंगी लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांचे अधिक जलद व सुरक्षित बचाव करणे शक्य होणार आहे.
पहा व्हिडिओ : पीएमपीएमएल बसवर पडलेले झाड अग्निशमन विभागाने हटवले
टिप्पणी पोस्ट करा