ब्युरो टीम : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती, आणि सुशीला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आज यशस्वीरित्या पार पडला.
या मेळाव्याला आमदार संजय खोडके, आमदार श्रीमती सुलभा खोडके, श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचे वसंतकुमारजी मालपाणी तसेच श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भांगडिया आणि प्रा. दिवेश सूर्यवंशी, श्रीमती चांडक यावेळी उपस्थित होत्या.
या मेळाव्याला जिल्ह्यासह परिसरातील विविध तालुक्यांमधून ४०० पेक्षा अधिक उमेदवारांनी उपस्थिती लावली. यामध्ये ३०० हून अधिक रिक्त पदांसाठी विविध नामांकित कंपन्या, ज्यात रेमंड लाइफस्टाइल, कॉटन अमरावती, इंडस्ट्रीज प्रा.लि., गुरुलक्ष्मी कोटेक्स प्रा.लि., टेक्नोक्रॉफ्ट, फ्लिपकार्ट, मुस्ली टोयोटा बजाज ऑटो, कोअर प्रोजेक्ट, आयलर्न फाउंडेशन, जाधव गियर्स लि, स्पंदन मायक्रो फायनान्स प्रा.लि., स्विगी, रेडियंट हॉस्पिटल, जिनस पॉवर लि. यांचा सहभाग होता. उद्योग, उत्पादन, आयटी, विक्री, मार्केटिंग आणि इतर क्षेत्रांतील प्रतिनिधींनी थेट ४७६ मुलाखती घेतल्या. यात २२४ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर ४ उमेदवारांची अंतिम निवड जागेवरच करण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. इतर उमेदवारांच्या मुलाखती पुढील प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आल्या. या मेळाव्यातील ठळक बाबींमध्ये ७ हजार१०० उमेदवारांची (ऑनलाइन/ऑफलाइन) उपस्थिती, १४ हून अधिक कंपन्यांचा सहभाग, ३०० पेक्षा जास्त रोजगाराच्या संधींची उपलब्धता आणि १०वी पास ते पदवीधरांपर्यंतच्या उमेदवारांचा सहभाग यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय खोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. श्री . खोडके यांनी अमरावती व विदर्भातील उद्योजकतेच्या आणि रोजगाराच्या संधींबाबत माहिती दिली.
आकडेवारी व प्रात्यक्षिक उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित उमेदवारांसमोर स्थानिक उद्योगविश्वाचे स्पष्ट चित्र मांडले. ते म्हणाले की, नोकरीची संधी उपलब्ध झाल्यानंतर जरी त्यामध्ये अडथळे निर्माण झाले, तरी त्या अडथळ्यांना मेहनतीने, जिद्दीने व विकासाने सामोरे जाण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये असले पाहिजे, तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो. त्यांनी युवकांना उद्योगधंद्यांची नवदिशा दाखवण्याबरोबरच, रोजगारक्षम असणाऱ्या उमेदवारांना नव्या संधी मिळाव्यात यासाठी प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आमदार श्रीमती सुलभा खोडके उपस्थित होत्या. त्यांनी शासन, लोकप्रतिनिधी आणि उद्योजक यांच्या सुसंवादातून स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील यावर माहिती दिली. युवकांनी कौशल्य वाढवून नवनवीन संधी मिळवाव्यात आणि आपल्या यशाने संपूर्ण जिल्ह्याचे भाग्य समृद्ध करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. नोकरी इच्छुक उमेदवारांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रोजगार मेळाव्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असून, भविष्यात अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे , असे आयोजक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी सांगितले. रोजगार मेळाव्याचे सूत्रसंचालन श्रीमती संपदा डावरे यांनी केले.
पहा व्हिडिओ : संत नामदेव महाराजांची पायरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती
टिप्पणी पोस्ट करा