PCMC :शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या टक्का वाढवण्यासाठी नियोजन करा - आयुक्त शेखर सिंह


ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षात मिळवलेले यश उल्लेखनीय आहे.  त्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे. पण येत्या काळात शिष्यवृत्ती परीक्षेसोबतच शालेयस्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होणे गरजेचे असून, त्यादृष्टिने सर्व शिक्षकांनी नियोजन करावे, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने आज चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक-मुख्याध्यापक संवाद सत्राचे आयोजन केले होते. या सत्रात मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते. 

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान, माध्यमिक प्रशासन अधिकारी बुधा नाडेकर, पर्यवेक्षिका प्रमिला जाधव, अंजली झगडे, सुनिता गीते, अनिता शेडगे, झेप फाऊंडेशनच्या नेत्रा तेंडूलकर यांच्यासह महापालिकेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

या संवाद सत्रात शैक्षणिक उपक्रमांमधील महत्त्वपूर्ण प्रगती आणि आगामी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीच्या महत्त्वाकांक्षी योजना सादर करण्यात आल्या. यावेळी मागील शैक्षणिक वर्षात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला,  ज्यामुळे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी वचनबद्धता अधोरेखित झाली.

यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह म्हणाले की,  शिक्षण विभागाने मागील काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक चांगले बदल केले असून, त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. आगामी काळात शहरातील महापालिकांच्या शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची ओळख, त्याबाबतचे शिक्षण आणि त्याविषयी साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत," असेही त्यांनी सांगितले. शिक्षण विभागाने राबवलेल्या स्पंदन, क्यूसीआय, भारत दर्शन आदी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत झालेली वाढ सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण विभागाने पुढाकार घेतलेल्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये पाठ्यपुस्तकी शिक्षणासोबतच 'माणूस' म्हणून जगण्याचे सूत्र शिकवले जात असून, येत्या काळात मुलांना त्याच पद्धतीचे शिक्षण देण्यावर आम्ही कटिबद्ध असणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व शिक्षक-मुख्याध्यापकांनी सर्व उपक्रमांची शंभर टक्के अंमलबजावणी करून येत्या काळात गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले की, ‘शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे. शिक्षण विभागासाठी जे शक्य आहे, ते सर्व महापालिकेकडून करण्यात येत असून, त्यानंतरही काही उणिवा राहिल्यास त्या तातडीने दूर करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. विद्यार्थ्यांसाठी क्रीडाशिक्षक आणि कौशल्य शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक वर्षात दहावीचा सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के लागणे गरजेचे असून, त्या दृष्टीने शाळांनी नियोजन करावे. विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणारे उपक्रम यशस्वी होतील, या दृष्टीने रूपरेषा तयार करावी," असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा विभाग, क्रीडा प्रबोधिनी आणि शिक्षण विभाग या सर्वांनी समन्वय ठेवून काम करावे. यशस्वी विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षण विभागाशी संबंधित असणाऱ्या सर्वांनीच समन्वयाने काम करणे आवश्यक आहे," असेही ते म्हणाले.

शिक्षक-मुख्याध्यापक संवाद सत्राची वैशिष्ट्ये

  • संगणक साक्षरता अभ्यासक्रमाचे व पुस्तकांचे अनावरण.
  • एस.ई.ई. लर्निंग (सामाजिक भावनिक विकास) ॲक्टिव्हिटीचे आयोजन.
  • क्यू.सी.आय. मूल्यांकनाचे निकाल व नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजनाचे सादरीकरण.
  • सक्षम प्रकल्प यांचे नवीन शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाचे सादरीकरण.
  • श्रीमती नेत्रा तेंडुलकर (झेप फाउंडेशन पुणे) यांचे समावेशन शिक्षण उपक्रम.जवाहर नवोदय विद्यालयाबाबत माहितीचे सादरीकरण.
  • सीएचडीसी उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या एमआयएस प्रणालीबाबत देण्यात आली माहिती

गुणवंत विद्यार्थ्यांचा एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मान

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले, अशा विद्यार्थ्यांचा महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये पारितोषिक म्हणून देण्यात आले. सन्मानित झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रुस्तम चातुर्वेदी, बुशरा शेख, आकाश मंडल, यशराज कांबळे, क्षितिज सांगडे, स्वप्नाली झिंजे, अमृता काजळे, प्रतीक्षा कांबळे, शिवकन्या शिंदे, धीरेंद्रकुमार महतो, सिद्धी पुलावळे, शरिका अन्सारी, शुभम कांबळे, संघर्ष सुरवसे, अनिकेत पाईकराव, अष्टविनायक मुदमवाड, मुस्कानकुमारी चौरसिया, गायत्री बिजमवार, देवेंद्र झोपोळ, ईशा पाटील, ताहूरा मणियार, श्याम येलनुरे, आशुतोष लांडगे, सार्थकी वाघमारे, श्रावणी टोणगे, देव पोखरकर, गणेश काळे, तनुजा पाडेकर यांचा समावेश होता.

तसेच, शिष्यवृत्ती व एन.एम.एम.एस. (NMMS) परीक्षेतील गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानही महापालिकेच्या वतीने करण्यात आला. याबरोबरच, गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने खराळवाडी माध्यमिक भागशाळा जाधववाडी येथील विद्यार्थी धीरेंद्रकुमार महतो आणि इंग्रजी माध्यम शाळा कासारवाडीची विद्यार्थिनी ईशा पाटील आदी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी मनोगतात महानगरपालिकांच्या शाळांमधील सोयीसुविधा, शिक्षणाचा दर्जा आणि महानगरपालिकेने वेळोवेळी केलेले सहकार्य याबाबत उल्लेख केला. त्याबरोबरच, महानगरपालिकेच्या शाळेने दिलेल्या शिकवणीतून मोठी स्वप्नांचा पाठलाग करण्याचे बळ मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी केले.

पहा व्हिडिओ : संत नामदेव महाराजांची पायरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने