विक्रम बनकर,अहिल्यानगर : कोरोना काळापासून देवगड येथून निघणारा पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला असून, त्याऐवजी पंढरपूर येथील देवगड मठामध्ये जाऊन तेथे विठुरायाच्या पंढरपूर क्षेत्राला दिंडी प्रदक्षिणा करून पंचदिनात्मक नामदेव गाथा पारायण सोहळा पंढरपूर येथील देवगडच्या मठात साजरा होणार आहे.
या सोहळ्याला हभप भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या समवेत भाविकांचे प्रस्थान देवगड देवस्थान येथून श्री क्षेत्र पंढरपूर येथे सोमवारी सायंकाळी झाले. यावेळी अहिल्यानगर येथे संत किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाच्या वतीने देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज व प्रकाशानंद गिरीजी महाराज यांचे स्वागत संभाजी नगर रोडवर करण्यात आले.
आषाढी वारी सोहळ्यानिमित्त भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरच्या देवगड मठापासून पंढरपूर नगरीत क्षेत्र प्रदक्षिणा करण्यासाठी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची पालखी दिंडी निघणार आहे. क्षेत्र प्रदक्षिणा दिंडीचे हे चौथे वर्ष आहे. क्षेत्र प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर दिंडीचा समारोप पंढरपूरच्या देवगड मठामध्ये करण्यात येईल. दि.३ पासून पंढरपूरच्या देवगड मठामध्ये पंचदिनात्मक नामदेव गाथा पारायण सोहळ्यास सुरूवात होणार आहे.
पंचदिनात्मक सोहळ्यात सकाळी ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते ८ गीता पठण, ९ ते ११ श्री नामदेव गाथा पठण, ११ ते १२ भोजन प्रसाद, दुपारी ३ ते ५ श्री नामदेव गाथा पारायण, सायंकाळी ५.३० ते ७ हरिपाठ व आरतीनंतर भोजन, रात्री ८.३० ते १० कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
सोहळ्यासाठी व्यासपीठ प्रमुख देवगडचे नारायण महाराज ससे, गणपत महाराज आहेर, रामनाथ महाराज पवार, संजय महाराज निथळे, मृदंगाचार्य गिरीजीनाथ जाधव, लक्ष्मण नांगरे, रोहित पटारे, गणेश तनपुरे, शशिकांत कोरेकर,सोमनाथ पानकडे यांच्यासह देवगड संस्थानचे विद्यार्थी मंडळ सेवा देणार आहे. सोहळ्याची जय्यत तयारी पंढरपूर येथील देवगड मठामध्ये सुरू झाली आहे.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा