PCMC :महापालिकेच्या अग्निशामक जवानांमुळे मुक्या जीवाला मिळाले जीवनदान!


ब्युरो टीम : रावेत गावठाण बीआरटीजवळील शाळेसमोरील कन्स्ट्रक्शन साईटवरील खोल खड्ड्यात पडलेल्या गायीला सुखरूप बाहेर काढून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक जवानांनी मुक्या जीवाला जीवनदान दिले आहे. ही कामगिरी पिंपरी, थेरगाव व प्राधिकरण अग्निशमन केंद्रांच्या बचाव पथकाने पार पाडली.

रावेत गावठाण बीआरटीजवळील शाळेसमोरील कन्स्ट्रक्शन साईटवरील खोल खड्ड्यात एक गाय पडली आहे, अशी माहिती मिळताच पिंपरी, थेरगाव व प्राधिकरण अग्निशमन केंद्रांमधून बचाव पथक तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले.

वाचा : इतिहास घडला! पिंपरी चिंचवड महापालिकेची ९० दिवसांत ५२२ कोटींची कर वसुली!

पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, सदर खड्डा अंदाजे ५०x५० फूट लांबीचा आणि ३५ ते ४० फूट खोल होता. पावसामुळे संपूर्ण भाग चिखलमय झालेला होता. अशा कठीण परिस्थितीत खड्ड्याच्या निसरड्या व चिखलयुक्त परिसरामुळे क्रेन थेट खड्ड्याजवळ नेणे शक्य नव्हते. मात्र क्रेनच्या बूमचा वापर करून व होज आणि दोराच्या साहाय्याने अग्निशामक जवानांनी गायीला दोन बेल्ट लावले. साधारण अर्धा तासाच्या प्रयत्नांनंतर गायीला सुरक्षितरित्या खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले.

सहआयुक्त तथा अग्निशमन विभागप्रमुख मनोज लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले व लिडिंग फायरमन सारंग मंगळूरकर, फायरमन काशिनाथ ठाकरे, सौरव इंगवले, अजय कटारनवरे, विकास पांढरे, विवेक वाघमोडे, शुभम जगताप आणि ऋषिकेश सावंत यांनी केली.

आमचे जवान हे आमच्या विभागाचे खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहेत. अशा मोहिमा केवळ प्रशिक्षणाने नव्हे, तर मनातली दया आणि बांधिलकीने पूर्ण होतात. एखाद्या माणसाच्या जीवाबाबत जितकी तत्परता आमचे जवान दाखवतात, तितकीच संवेदना मुक्या जीवांबाबतही दाखवणे यातूनच अग्निशमन विभागातील जवानांचा सेवाभाव दिसून येतो.

मनोज लोणकर, सहआयुक्त तथा अग्निशमन विभागप्रमुख, पिंपरी चिंचवड महापालिका

ही कामगिरी फक्त तांत्रिक कौशल्याने नाही, तर जवानांच्या संवेदनशीलतेने व सेवाभावाने शक्य झाली. ४० फूट खोल खड्डा, अंधार आणि चिखल अशा अत्यंत कठीण परिस्थितीत देखील जवानांनी हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले. शहरातील नागरिकांसोबतच मुक्या जीवांचं रक्षण करणं, ही आमची जबाबदारीच नव्हे तर आमचं कर्तव्य आहे.

ऋषिकांत चिपाडे, उपअग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

पहा व्हिडिओ : विधानभवनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने , नाना पटोले  निलंबित 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने