PCMC : सफाई अपनाओ, बिमारी भगाओ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड शहरात साप्ताहिक स्वच्छता मोहिम


ब्युरो टीम :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत "सफाई अपनावो, बिमारी भगाओ" या जनजागृती अभियानांतर्गत शहरातील विविध भागांमध्ये साप्ताहिक स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आणि उप आयुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही साप्ताहिक स्वच्छता मोहीम व्यापकपणे राबवण्यात येत आहे. या साप्ताहिक स्वच्छता मोहिमे अंतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांपासून प्रतिबंधात्मक उपायांची माहिती शहरातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध माध्यमातून जनजागृती देखील केली जात आहे. 

या उपक्रमांतर्गत अ क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्र. १० अंतर्गत चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये श्री. जैन प्राथमिक विद्यालय, नवी दिशा महिला बचत गट यांसारख्या सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग होता. यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अ क्षेत्रीय सहाय्यक आरोग्य अधिकारी सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक दत्तात्रय गणगे, आरोग्य सहाय्यक बाबासाहेब जमादार, तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विविध क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत राबविण्यात आली स्वच्छता मोहीम 

  • अ क्षेत्रीय कार्यालय: सायन्स पार्क, खंडोबा मंदिर आकुर्डी, मधुकर पवळे पूल, मदर तेरेसा उड्डाणपूल 
  • ब क्षेत्रीय कार्यालय: राष्ट्रमाता जिजाऊ गार्डन रावेत, बिजलीनगर, जिजाऊ पर्यटन केंद्र, एम्पायर पूल 
  • क क्षेत्रीय कार्यालय: पुणे-नाशिक हायवे ब्रिज, जाधववाडी, खराळवाडी उड्डाणपूल 
  • ड क्षेत्रीय कार्यालय: ताथवडे उड्डाणपूल, पिंक सिटी रोड, डायनासोर गार्डन कॉम्प्लेक्स 
  • इ क्षेत्रीय कार्यालय: वडमुखवाडी, भोसरी पूल, सावंत नगर, सहल केंद्र दिघी 
  • ग क्षेत्रीय कार्यालय: काळेवाडी फाटा, थेरगाव, डांगे चौक पूल 
  • फ क्षेत्रीय कार्यालय: देहू-आळंदी रोड, स्पाईन रोड, तळवडे रोड, भक्ती शक्ती पूल 
  • ह क्षेत्रीय कार्यालय: कासारवाडी, सांगवी फाटा, बीआरटी रोड 

या आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. 

पिंपरी चिंचवड शहरात व्यापक स्तरावर स्वच्छता व्हावी तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी याहेतूने महापालिकेने साप्ताहिक स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी नागरिकांनी महापालिकेस सक्रिय सहकार्य करावे.

सचिन पवार, उप आयुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने