विक्रम बनकर (ब्युरो टीम) : मुंबईतील वरळी येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षांचा आवाज मराठीचा हा विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, ‘जे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि इतर कोणालाही जमलं नाही, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं.’
राज ठाकरे म्हणाले, ‘मी मागे माझ्या मुलाखतीत म्हटलं की कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा माझ्यासाठी महाराष्ट्र व मराठी माणूस मोठा आहे. त्या वक्तव्यापासून राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, एक गोष्ट खरी, जे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, राज्यातील कुठल्याही नेत्याला, व्यक्तीला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं. आम्हा दोघांना एकत्र आणणं फडणवीसांना जमलं.’
तर दुसरीकडे या मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्याबरोबर युतीचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राजने भाषणाच्या सुरुवातीला माझा उल्लेख सन्माननीय असा केला. त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची सुरुवात सन्माननीय राज ठाकरे अशीच करत आहे. राजने त्याच्या भाषणात मराठीचा मुद्दा व हिंदीच्या सक्तीबाबत अप्रतिम मांडणी केली आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची आवश्यकता वाटत नाही. वैयक्तिक मला वाटतं की आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्या दोघांमधील अंतरपाठ अण्णाजीपंतांनी दूर केला आहे. आता तुमच्याकडून अक्षता टाकण्याची अपेक्षा नाही. आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी.’
व्हिडिओ : पहा मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण
टिप्पणी पोस्ट करा