Ahilyanagar : माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम

ब्युरो टीम : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पुढाकारातून व भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने फिरोदिया हायस्कूलसह महानगरपालिकेच्या रेल्वे स्टेशन रस्त्यावरील शाळेमध्ये शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यात दोन्ही शाळांमधील २१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शाडू मातीच्या गणेश मूर्ती घडवल्या. नगरकरांनी यावर्षीचा गणेश उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, शक्य तितके शाडू-मातीच्या गणेश मूर्तींचा वापर करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.

अहिल्यानगर महानगरपालिका आणि भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझी वसुंधरा अभियान ६.०' अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्राचार्य उल्हास दुगड, उपप्राचार्य कैलास साबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब वाव्हळ, वैभव कुलकर्णी, कल्पना पाठक, शिल्पकार बालाजी वल्लाळ, मनपाचे पर्यावरणदूत सतीश गुगळे, अध्यापक बाळासाहेब पालवे, अर्चना आळकुटे, मनिषा कांबळे आदी उपस्थित होते. फिरोदिया हायस्कूलच्या कार्यशाळेत सुमारे ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत गणेशमूर्ती तयार केल्या. महानगरपालिकेच्या शाळा क्र. ४, रेल्वे स्टेशन येथेही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्वच्छता दूत व कला शिक्षक डॉ. अमोल बागूल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्वतःहून शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार केल्या.

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महानगरपालिका माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवत आहेत. गणेशोत्सवात पर्यावरणपूर्वक गणेश मूर्ती, पर्यावरणपूर्वक सजावटीचे साहित्य वापरावे. बंदी असलेल्या व पर्यावरणासाठी घातक असलेल्या प्लॅस्टिक, थर्माकोलचा वापर सजावटीसाठी करू नये, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने