Dr Neelam Gorhe : विद्यार्थ्यांनो मराठी शिकण्याचा प्रयत्न करा - डाॅ.निलम गोऱ्हे

ब्युरो टीम : मराठी भाषा ही अत्यंत प्राचीन आणि सांस्कृतीकदृष्ट्या समृद्ध आहे. तिला हजारो वर्षांचा वारसा असून, मराठी साहित्य, नाटकं, गाणी अत्यंत विलोभनीय आहेत. त्यामुळे परराज्यातून शिक्षणासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्रीयन जेवण सर्वांनाच आवडते, त्यामुळे मराठी माणसाशी, मराठीत बोलल्यास तो दोन घास अधिक प्रेमाने वाढतो. तसेच मराठी शिकल्याने चांगले भांडता देखील येते, अशी कोटी महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती डाॅ.नीलम गोऱ्हे यांनी अस्खलित इंग्रजीत भाषेत केली आणि येथील स्वामी विवेकानंद सभामंडपात हजारो विद्यार्थ्यांकडून टाळ्यांचा एकच कडकडात झाला.

डाॅ.गोऱ्हे पुणे येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या १०व्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होत्या.

यावेळी, व्यासपीठावर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) वैज्ञानिक पद्मश्री डाॅ.नागराजन वेदाचलम, मालवीय राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नाॅलाॅजीचे (एमएमआयटी) संचालक प्रा.डाॅ.एन.पी.पाधी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र. कुलपती प्रा.डाॅ.मंगेश कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., इस्कॉन पुणेचे प्रमुख राधेशाम, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डाॅ.गोऱ्हे पुढे म्हणाल्या, मला विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावायला, इथे भाषण करायला प्रचंड आवडते कारण, इथे त्यांच्याकडून सभात्याग केला जाण्याची शक्यता नसते. खरं तर, सध्या विद्यार्थ्यांवर पालकांच्या अपेक्षांचे ओझे प्रचंड वाढत चाललं आहे त्यामुळे, पालकांसाठी अभिमुखता शिबिराचे आयोजन केले पाहिजे. यासह, विद्यार्थ्यांनीही एमआयटी एडीटी सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठात शिकताना कायदा हातात न घेता एक चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न सातत्याने करायला हवा. 

डाॅ.मंगेश कराड यावेळी म्हणाले, प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयटी एडीटी विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासावर भर देणारे शिक्षण पुरवत आहे. या विद्यापीठाच्या जडणघडणीत येथील प्रत्येक कर्मचाऱ्याचे बहुमुल्य योगदान आहे. त्याचमुळे आज दहाव्या वर्षात पदार्पण करत असताना यशाच्या अनेक शिखरांना आपण गवसणी घातली आहे. 'नॅक'कडून नुकतीच मिळालेली 'अ' श्रेणी हे त्याचेच द्योतक आहे. भविष्यातही एमआयटी एडीटी विद्यापीठ यशाच्या नव-नव्या शिखरांवर पोचेल याचा मला विश्वास आहे.   

विश्वशांती प्रार्थना सुरुवात तर राष्ट्रगीताने समारोप झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.राजेश एस., यांनी तर आभार डाॅ.पुजेरी यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा.श्रद्धा वाघटकर, प्रा.स्वप्निल शिरसाठ, डाॅ.अशोक घुगे यांनी केले. 

पुण्याला अभियांत्रिकी आणि तांत्रिक शिक्षणाचा प्रचंड मोठा वारसा आहे. १८५४ साली ब्रिटीशांकडून पुण्यातील पहिल्या आणि भारतातील एकंदर तिसऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर काळाजी गरज ओळखून १९८४ साली कोथरूड येथे महाराष्ट्रातील पहिल्या खासगी महाराष्ट्र तंत्रज्ञान संस्था (एमआयटी) अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड यांनी केली. त्यामुळे, पुण्यात आणि खासकरून एमआयटीचे आमंत्रण स्विकारायला मला कायमच आवडते.    

-  पद्मश्री डाॅ.नागराजन वेदाचलम, वैज्ञानिक, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो)

प्रा.प्रदीप प्रभूंना जीवनगौरव पुरस्कार

याप्रसंगी बिलींग विभागाचे प्रमुख, प्रा.प्रदीप प्रभू यांना विद्यापीठाच्या जडणघडणीतील बहुमुल्य योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्यासह डाॅ.अतुल पाटील, डाॅ.राजशेखर राठोड, प्रा.तुषार चौरुशी, डाॅ.शालिनी गर्ग, संदीप जाधव, यशस्विनी पिसोलकर यांचाही त्यांच्या योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने