ब्युरो टीम : मराठी भाषा आपल्या अभिमानाशी व संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. या भाषेच्या संवर्धनासाठी महापालिका कटिबद्ध असून अभिजात मराठी भाषा दिन आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने सर्व समावेशक कार्यक्रम आणि उपक्रम राबविले जाणार आहेत, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले. मराठी भाषा संवर्धनासाठी शहरात कार्यरत असणाऱ्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी आपला सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या निर्देशानुसार येत्या ३ ऑक्टोबर रोजी ‘अभिजात मराठी भाषा दिन’ आणि ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आयोजित नियोजन बैठकीत अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर बोलत होत्या.
या बैठकीस उप आयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, ग्रंथपाल प्रवीण चाबुकस्वार, वर्षा जाधव, राजेंद्र आंभेरे, संगीत शिक्षक मिलिंद दलाल यांच्यासह अखिल भारतीय मरठी नाट्य परिषेदेच्या मुबई शाखेचे उपाध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मराठी साहित्य परिषदेचे शहर प्रमुख राजन लाखे, पिंपरी चिंचवड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर, माजी नगर सदस्या भारती फरांदे, पिंपरी चिंचवड मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश निर्मल, सदस्य हेमंत जोशी, पिंपरी चिंचवड कलाकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार उलपे, मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करणारे प्रभाकर पवार, विकास कडलग, रुपेश पटेकर, सीमा बेलापूरकर, निलाक्षी साबळे, के डी कड, विजय जगताप, विष्णू मांजरे, प्रा, राजेंद्र सोनवणे, दत्ता गुंड, अनुराधा प्रभू, विशाल मीठे, रमेश वाकनीस, सुरेश कंक, मुरलीधर दळवी, प्रदीप गायकवाड, सुहास जोशी, मनोज डाळिंबकर, प्रणव जोशी, राजेंद्र बंग, शिवमूर्ती भडंगे, प्रतिक गायकवाड, चंद्रशेखर जोशी, सुप्रिया पांडे, सुनील भिसे, किशोर केदारी, पांडुरंग सुतार, संतोष पोकळे, तसेच मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या संस्था, संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, साहित्यिक, विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, तसेच मराठी भाषाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी ‘अभिजात मराठी भाषा दिन’ व ‘सप्ताह’ साजरा करण्यामागील उद्देश, शासनाच्या सूचना आणि महापालिकेच्या वतीने कार्यक्रमाची रूपरेषा व भूमिका याबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
या बैठकीत तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा व शिबिरे , अभिजात मराठी भाषेतील प्राचीन व मौल्यवान ग्रंथांचा अभ्यास व परिचय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी ग्रंथ व साहित्यांचे प्रदर्शन, प्राचीन ग्रंथ संपदेचे समकालीन मराठीत अनुवादित पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, निबंधलेखन, वक्तृत्व अशा विविध विषयांवर सूचना मांडण्यात आल्या.
याशिवाय, मराठी भाषेशी निगडित नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठीही प्रस्ताव मांडण्यात आले. उपस्थित प्रतिनिधींनी महापालिकेच्या उपक्रमांना सक्रिय सहकार्य करण्याची ग्वाही दिली. ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या अभिजात मराठी भाषा सप्ताह यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य कार्य करून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वयक किरण गायकवाड यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सांस्कृतिक क्षेत्रात चांगले काम करत असून अभिजात मराठी भाषा दिन आणि सप्ताहानिमित्त महापालिकेने अविस्मरणीय कार्यक्रमांचे आयोजन करावे, यामध्ये सर्व स्तरातील घटकांचा विचार करून त्या त्या क्षेत्रात मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीना कार्यक्रम नियोजन आणि आयोजनात सहभागी करत जबाबदारी सोपवावी असे भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी सांगितले, कला क्षेत्रात व्यावसायिक आणि चळवळ अशी वर्गवारी करून कार्यक्रमाची योग्य पद्धतीने आखणी करावी, महापालिका शाळेतील शिक्षकांना मराठी भाषेविषयी सखोल मार्गदर्शन करणारी कार्यशाळा आयोजित करावी, नाट्यविष्कारातील व्यक्तिमत्व विकास होत असतो त्यामुळे महापालिका शाळेत नाट्य शास्त्राचा अभ्यासक्रम शिकवावा, मराठी भाषा संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध तज्ञांचा सहभाग असलेली समिती महापालिकेने स्थापन करून त्यांच्या माध्यमातून शहरात उपक्रम राबवावेत अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.
मराठी भाषेची शुद्धता रुजविण्यासाठी कार्यशाळा आयोजित करावी, मराठी साहित्यांचा प्रवास नव्या पिढी समोर आणण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करावे, औद्योगिक कार्यक्षेत्रात देखील मराठी भाषेचे कार्यक्रम आयोजित करावेत आदि सूचना राजन लाखे यांनी मांडल्या. मराठी व्याकरण आणि शुद्धलेखन, मराठी शब्दांचा बोलण्यात आणि लिखाणात वापर यावर भर देणारे कार्यक्रम महापालिकेने आयोजित करावेत, स्थानिक बोली भाषांचा परिचय करून देणारे कार्यक्रम तसेच मराठी हस्ताक्षर स्पर्धा मराठी भाषा सौंदर्याची माहिती देणारे कार्यक्रम घ्यावेत, अशा सूचना नंदकुमार सातुर्डेकर यांनी मांडल्या.
स्वरचित मराठी कविता, निबंध स्पर्धा, सुलेखन स्पर्धा, मराठी उच्चारण कार्यशाळा, नाट्यछटा, नाट्य व मराठी साहित्य अभिवाचन, एकांकिका, लघुनाट्य, कवी संमेलन, हस्ताक्षर स्पर्धा, स्थानिक बोली भाषेची ओळख, संगीत सादरीकरण, चित्रकला स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, गृहनिर्माण संस्थांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन, वैज्ञानिक जयंत नारळीकर यांच्या स्मरणार्थ निबंध स्पर्धाचे आयोजन, मराठी संस्कृती दर्शवणारी वेशभूषा आणि त्यांची माहिती देणारे कार्यक्रम, संत रचनेवरील अभंग स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, परप्रांतीयांचा सहभाग असलेला मराठी कार्यक्रम आणि कार्यशाळा, बहुभाषिक सांस्कृतिक कार्यक्रम, शाळेमध्ये मराठी कवी संमेलन, उद्यानामध्ये मराठी सुविचाराचे फलक लावणे, प्रशासनामध्ये मराठी भाषेचा वापर वादविवाद स्पर्धा, ३ ते ८ वयोगटातील बालकांसाठी मराठी वाचनाचा कार्यक्रम. मोदी लिपी कार्यशाळा, मराठी बाल साहित्य महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करणे, शहरात मराठी भाषेच्या विविध कलाप्रकार व साहित्य प्रकारची माहिती देणारे, सर्वसमावेशक ग्रंथालय उभारणे, मराठी भाषेची शब्दावलीचा प्रचार व प्रसार करणे, व्यवहारात मराठी भाषेचा वापर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, शहरातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा संवर्धन उपक्रमांचे आयोजन करणे आदी. सूचना मांडण्यात आल्या.
बैठकीत प्राप्त झालेल्या सूचनांचा अंतर्भाव करून अभिजात मराठी भाषा दिन व सप्ताहातील कार्यक्रम आणि उपक्रमाचे आयोजन केले जाईल. तसेच मराठी भाषा संवर्धनासाठी सुचवलेल्या दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याबद्दल महापालिका प्रयत्न करेल असे आश्वासन महापालिका अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांनी दिले.
पहा व्हिडिओ : वंदे भारत एक्सप्रेस चे स्वागत
टिप्पणी पोस्ट करा