Har Ghar Tiranga : पथनाट्यातून फुलली स्वच्छतेची सुवासिक जाणीव!

ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाअंतर्गत सादर झालेल्या पथनाट्याने नागरिकांच्या मनात स्वच्छतेची सुवासिक जाणीव फुलवली. यामध्ये स्वच्छ हात, स्वच्छ घर, स्वच्छ शौचालय, स्वच्छ परिसर, स्वच्छ नदी आणि स्वच्छ सार्वजनिक ठिकाणांपर्यंतचा प्रवास रंगतदार संवाद, हलक्या फुलक्या विनोदाचा फुलोरा आणि प्रभावी अभिनयातून रंगमंचावर खुलला.

पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभागाकडून ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ या विशेष मोहिमेच्या माध्यमातून शहरात देशप्रेम आणि स्वच्छतेची जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. ही तीन टप्प्यांत राबविण्यात येणारी विशेष मोहीम २ ऑगस्टपासून सुरू झाली असून १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत राबविली जाणार आहे. याअंतर्गत आज भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे स्वच्छतेविषयक पथनाट्य सादर झाले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे, अतुल पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे आणि स्वच्छतेचे सहा महत्त्वाचे मंत्र प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवणे, या उद्देशातून सादर झालेल्या या पथनाट्यातून स्वच्छतेमुळे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम समजावून सांगण्यात आले. या पथनाट्यात कलाकारांचा प्रभावी अभिनय, विनोदाच्या हलक्या फुलक्या फुलोऱ्याने सजवलेले संवाद आणि वास्तवाशी घट्ट निगडित मांडणीमुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

महापालिकेच्या स्वच्छतेविषयक उपक्रमांची दिली माहिती

स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेला देशात सातवा व राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. आता स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये महापालिकेने देशात प्रथम क्रमांक मिळवण्याचा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देखील पथनाट्यातून देण्यात आली. अनिकेत शिंदे, प्रमोद आगडे, शिवप्रसाद पासलकर, मलिक खटिंग, स्वप्नील बिऱ्हाड आणि राजेंद्र देसले या कलाकारांनी हे पथनाट्य सादर केले. नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात या कलाकारांचे कौतुक केले.

पहा व्हिडिओ 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने