भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीसह शहरातील विविध ऐतिहासिक वास्तू, उड्डाणपूल, शासकीय इमारती आदी ठिकाणी आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाईने करण्यात आली आहे.
Tweet
विशेषतः नाशिक फाटा उड्डाण पूल आणि मदर तेरेसा उड्डाण पूल केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांच्या प्रकाशात न्हाऊन निघाले आहेत. या रंगांचा मोहक संगम नागरिकांना एकतेची, अभिमानाची आणि देशभक्तीची अनुभूती देत आहे.
केंद्र शासनाच्या ‘घरो घरी तिरंगा’ मोहिमेच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय भवन, क्षेत्रीय कार्यालये, उड्डाणपूल तसेच उद्याने यांच्यामध्ये ही रोषणाई साकारण्यात आली आहे. हा उपक्रम केवळ शहराचे सौंदर्य वाढवत नाही, तर स्वातंत्र्याच्या अमूल्य पर्वाची आठवण करून देतो आणि देशभक्तीची ज्वाला प्रत्येक मनामनात प्रज्वलित करीत आहे.
या मोहक रोषणाईमुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक नागरिक भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या स्वागतासाठी सजलेल्या या इमारती व पूल आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपून या क्षणांना कायमस्वरूपी साठवून ठेवत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये झळकणारा तिरंग्याचा प्रकाश जणू स्वातंत्र्याच्या गौरवगाथेचा उज्ज्वल साक्षीदार ठरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा