Sangli : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून सहा महिन्यात पाच कोटी 92 लाखांची मदत

ब्युरो टीम : समाजातील आर्थिकदृष्ट्या गरजू आणि दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर  उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून अर्थसहाय्य पुरविले जाते. या कक्षाच्या माध्यमातून 1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीत सांगली जिल्ह्यातील 747 रूग्णांना 5 कोटी 92 लाख 98 हजार रूपयांची मदत उपचारांसाठी करण्यात आली आहे. ही माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या वैद्यकीय अधिकारी तथा अध्यक्ष डॉ. मनीषा पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एकूण 20 आजार समाविष्ट आहेत. जिल्हा स्तरावर हा कक्ष स्थापन करण्यात आल्यामुळे जिल्हा स्तरावरच अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, माहिती, संलग्न असणाऱ्या रूग्णालयांची यादी सहज उपलब्ध होत आहे. हा कक्ष खऱ्या अर्थाने अनेकांसाठी ‘जीवनदायी’ ठरत आहे. यासाठी रूग्णांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे राज्य व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांचे ऋण निर्देश व्यक्त केले आहेत.

हरिपूर येथील एक युवक वॉटर पार्कमध्ये गेला असता, पाय घसरून पडल्यामुळे गंभीर अपघात झाला. त्याच्यावर उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून एक लाख रूपयांची मदत मिळाली. याबाबत रूग्णाचे काका म्हणाले, अपघातानंतर पुतण्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता, त्याच्यावर उपचारासाठी डॉक्टरांनी सहा ते सात लाख रूपये खर्च येईल, असे सांगितले. पण, आमची परिस्थिती नव्हती. आम्हाला नुकत्याच जिल्हा स्तरावर स्थापन झालेल्या मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाची माहिती मिळाली. वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा पाटील यांच्याकडून उपचारासाठी मिळणारी मदत, अर्ज व कागदपत्रे यांची माहिती घेतल्यानंतर आम्ही अर्ज भरून दिला ते मंजूर होऊन आम्हाला एक लाख रूपयांची मदत मिळाली. वेळेवर आर्थिक मदत मिळाल्याने आमच्या पुतण्यावर उपचार करता आले आणि आम्ही त्याचे प्राण  वाचवू शकलो. त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.  

तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडीच्या पावणेतीन वर्षांच्या चिमुरड्यावर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतून व मुख्यमंत्री सहाय्यता निधी अशा दोन्ही योजनांच्या माध्यमातून जवळपास सात लाखाहून अधिक रूपयांची मदत मिळाली. त्यातून त्याच्यावर 15 दिवसांपूर्वी कॉकलियर इम्प्लांटची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. याबाबत त्याच्या आई म्हणाल्या, बाळाला ऐकू येत नसल्याचे एप्रिल महिन्यात आमच्या लक्षात आले. त्यानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेच्या आरोग्य तपासणी पथकातील डॉ. पलंगे तसेच तासगाव पंचायत समिती शिक्षण विभागातील विशेष शिक्षिका वर्षाराणी जाधव यांनी उपचाराबाबत व मिळणाऱ्या शासकीय मदतीबद्दल मार्गदर्शन केले. स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत झाली. त्यातून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतून व मुख्यमंत्री सहाय्यता निधी अशा दोन्ही योजनांच्या माध्यमातून जवळपास सात लाख रूपयांहून अधिक आर्थिक सहाय्य मिळाले. त्यामुळे आमच्या बाळावर 15 दिवसांपूर्वी कॉकलियर इम्प्लांटची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मदत केलेल्या सर्वांचे आभारी आहोत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने